Nashik News, Movement against tree felling
गंगापूर रोडवरील वृक्षतोडीविरोधात आंदोलन करताना वृक्षप्रेमी  Pudhari Photo
नाशिक

Nashik News | गंगापूर रोडवर स्थानिकांकडून वृक्षप्रेमींना मारहाण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : गंगापूर रोडवरील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वृक्षांच्या तोडणीस विरोध करणाऱ्या वृक्षप्रेमींना स्थानिक नागरिकांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. 2) घडली. वृक्षतोडीबाबत महापालिकेच्या उद्यान अधीक्षकांनी केलेल्या संयुक्त पाहणीदरम्यान हा प्रकार घडला.

महापालिकेने काही महिन्यांपूर्वी नाशिक-पुणे महामार्गावरील द्वारका ते दत्त मंदिर दरम्यान जवळपास १३ वटवृक्ष हटवत यशस्वीरीत्या पुनर्रोपण केले. त्या धर्तीवर गंगापूर रोडवरील अडथळा ठरणारे महाकाय वृक्ष हटविण्याची मागणी स्थानिक नागरिकांची होती. त्या अनुषंगाने महापालिकेच्या उद्यान विभागाने हरकती व सूचना मागविल्या होत्या. त्या आधारे गंगापूर रोडवरील मोठे वृक्ष हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, वृक्षप्रेमींनी हरकत घेताना वृक्ष हटविण्याची आवश्यकता नसल्याचा दावा केला. उद्यान विभागातील अधिकारी एसी केबिनमध्ये बसून वृक्षतोडीचा निर्णय घेतात, असा आक्षेप वृक्षप्रेमींकडून घेतला गेल्याने आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या आदेशांनुसार उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी मंगळवारी वृक्षप्रेमींसह संयुक्त पाहणी दौरा आयोजित केला होता. त्यानुसार भदाणे हे वृक्षप्रेमींसह गंगापूर रोडवर सकाळी पाहणीसाठी पोहोचले असता, वृक्षप्रेमींनी रिंगण करून वृक्षतोड न करण्याची मागणी केली होती. यावेळी स्थानिकांनी वृक्ष हटविण्याचे समर्थन केले. या चर्चेदरम्यान वाद वाढत जाऊन धक्काबुक्की आणि मारहाणीपर्यंत पोहोचला. त्यानंतर मारहाण झालेल्या वृक्षप्रेमींनी गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

काय आहे स्थानिकांची मागणी?

गंगापूर रोडवर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या या वृक्षांमुळे आजवर अनेक वेळा अपघात होऊन वाहनधारकांचा बळी गेला आहे. या वृक्षांमुळे वाहतूक कोंडी होते. वाहनधारकांकडून कर्णकर्कश हॉर्न वाजवले जातात. त्यामुळे ध्वनी व वायू प्रदूषणही होते. त्यामुळे वृक्ष हटविण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. वृक्षप्रेमी मात्र वस्तुस्थिती समजून घेत नसल्यामुळे स्थानिक नागरिक संतापले. त्यातून मारहाणीचा प्रकार घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

महापालिका वृक्ष हटविणार

या संयुक्त पाहणीनंतर उद्यान अधीक्षक भदाणे यांनी गंगापूररोडवरील पाच, दिंडोरी रोडवरील सात, पेठरोडवरील एक, रिंग रोडवरील एक व नाशिक पूर्व विभागातील एक असे १५ वृक्ष हटविण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व वटवृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. यासंदर्भातील अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार असल्याचे भदाणे यांनी सांगितले.

संयुक्त पाहणीदरम्यान नागरिकांच्या मागणीनुसार गंगापूर रोडसह शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारे १५ वृक्ष हटवून त्यांचे अन्यत्र पुनर्रोपण केले जाणार आहे. महापालिकेने आतापर्यंत पुनर्रोपण केलेले सर्व वृक्ष जगले आहेत.
- विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, महापालिका.
वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या या धोकादायक वृक्षांमुळे अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. अपघातामुळे कित्येक जण जायबंदी झाले आहेत. निष्पाप लोकांचे बळी थांबले पाहिजे, इतकीच आपली मागणी आहे. स्थानिक नागरिक आणि वृक्षप्रेमींमध्ये समेट घडवून आणण्याचा आपण प्रयत्न केला. आपण कोणासही मारहाण केलेली नाही.
- विलास शिंदे, नगरसेवक.
वृक्षतोडीविरोधात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केल्याने विलास शिंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मारहाण केली. आमचा वृक्षतोडीला विरोध आहे. आता जीव गेला, तरी वृक्ष तोडू देणार नाही.
- जगबीर सिंग, संस्थापक, मानव उत्थान मंच.
SCROLL FOR NEXT