नाशिक : विविध राज्यांमध्ये जीएसटी कायद्यांबाबत न्यायालयाचे निकाल विभिन्न येत असल्याने, जुने घर विकून नवीन घर घेताना, मुद्रांक शुल्क भरायचा की नाही? अशा स्वरूपाचा संभ्रम निर्माण होण्याचे काही प्रकार समोर येतात. अशावेळी बांधकाम व्यावसायिकांना योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. याशिवाय येणाऱ्या प्रत्येक अडचणींचे समाधान केले जाईल, असे आश्वासन जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त अजित दान यांनी दिले.
नरेडको (National Real Estate Development Council) नाशिक आयोजित कार्यकारिणी समिती बैठकीत ते बोलत होते. दर महिन्याला आयोजित या बैठकीत शासनाचा प्रतिनिधी आमंत्रित करण्याची पद्धत विद्यमान कार्यकारिणीने सुरू केली आहे. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त दान यांनी उपस्थित पदाधिकारी आणि सदस्यांसोबत विविध धोरणात्मक विषयांवर चर्चा केली. तसेच रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित करप्रणाली, जीएसटी संदर्भातील मुद्दे, विकासाच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले. नरेडको सदस्यांना जीएसटी कायद्याच्या अनुषंगाने अडचणी उद् भवल्यास, प्रशासन पातळीवर सहकार्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. अध्यक्ष सुनील गवादे, सचिव शंतनू देशपांडे, कोषाध्यक्ष भूषण महाजन, मार्गदर्शक जयेश ठक्कर तसेच सर्व कार्यकारिणी सदस्यांनी दान यांचे आभार मानले. बैठकीस नरेडको कार्यकारिणी समितीचे ३० सदस्य तसेच आयसीएआय नाशिक शाखा अध्यक्ष जितेंद्र कापड, खजिनदार विशाल वाणी, सनदी लेखापाल, अनिल कोठावदे, पुष्कर दास, सनदी लेखापाल तुषार लोखंडे आदी उपस्थित होते.