शहरातील काही इमारतींच्या तळघरांत केलेली पार्कींगासाठी सोय. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Nashik News | दिल्ली दुर्घटनेवरुन धडा; तरीही तळघरांच्या सर्वेक्षणासाठी कागदी घोडे

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : दिल्लीत इमारतीच्या तळघरातील कोचिंग क्लासमध्ये पावसाचे पाणी शिरून तीन विद्यार्थ्यांचे बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील इमारतीच्या तळघरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तळघरांच्या अनधिकृत व्यावसायिक वापराला चाप लावण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या महासभेच्या आदेशांना नगररचना आणि अग्निशमन विभागाने केराची टोपली दाखविली असून, सर्वेक्षणाच्या जबाबदारीवरून या दोन्ही विभागांतील अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी सुरू आहे.

दिल्लीत दुर्घटनेवरून संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. या निमित्ताने इमारतींच्या तळघरांच्या अनधिकृत व्यावसायिक वापराचा प्रश्न चर्चेत आला आहे. यावरुन इमारतींमधील तळघरांचा अनधिकृतरीत्या व्यावसायिक वापर होत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.

नाशिक येथील इमारतींमध्ये तळघरात साचलेले पावसाचे पाणी

तरीही कागदी घोडे नाचविले जात आहेत

काही वर्षांपूर्वी नाशिकमधील रेडक्रॉस सिग्नललगतच्या खासगी इमारतीच्या तळघरामध्ये आग लागून लाखोंचे संगणक जळून खाक झाल्याची दुर्घटना घडली होती. इमारतींमधील तळघरांचा अनधिकृतरीत्या व्यावसायिक वापर होत असल्याचे या घटनेतून समोर आले होते. महासभेत या दुर्घटनेची चर्चा झाल्यानंतर शहरातील सर्वच इमारतींच्या तळघरांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते. पार्किंगच्या जागेत अनधिकृत बांधकाम आढळल्यास कारवाईचे निर्देशही देण्यात आले होते. परंतु, या आदेशांवर नगररचना तसेच अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कुठलीही कारवाई झालेली नाही. आजही शहरातील अनेक इमारतींच्या तळघरांचा अनधिकृरीत्या व्यावसायिक वापर होत आहे. त्यास अद्यापही आळा बसलेला नसून कारवाईसाठी कागदी घोडे नाचविले जात आहेत.

इमारतींमधील तळघरांचा अनधिकृतरीत्या व्यावसायिक वापर होत आहे.

अधिकाऱ्यांचे कानावर हात

या सर्वेक्षणाचे काय झाले याविषयी नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता अनधिकृत बांधकामे हटविण्याची जबाबदारी अतिक्रमण विभागाची असल्याने सर्वेक्षणाची जबाबदारी अतिक्रमण विभागाचीच असल्याचे सांगण्यात आले. यावर अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अनधिकृत वापराचा मुद्दा नगररचना विभागाशी संबंधित असल्याने नगररचना विभागाने अनधिकृत वापर असल्याचा अहवाल दिल्यानंतर अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT