लासलगाव : माथाडी- मापारी कामगार बाजार समितीत होणाऱ्या कामावर हजर असूनही व्यापारी मजुरीची रक्कम कपात करत नाहीत. त्यामुळे सोमवारी (दि.२९) पासून कामगार कामकाज करणार नसल्याचे लेखी पत्र लासलगाव बाजार समितीचे कामगार संचालक रमेश पालवे यांनी बाजार समिती प्रशासनास दिले आहे. याबाबत बाजार समितीने व्यापारी वर्गास योग्य त्या सूचना करून माथाडी मापारी कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी माथाडी- मापारी कामगार यांनी केली आहे
पत्रात म्हटले आहे की, माथाडी- मापारी कामगार बाजार समितीचे परवानेधारक व माथाडी मंडळातील नोदित कामगार असून माथाडी कामगार संघटनेचे सभासद आहेत. बाजार समितीमधील माथाडी- मापारी कामगारांना प्रचलित पद्धतीने कामकाज देण्याबाबत जिल्हा उपनिबंधकांकडील दि. २७ मार्च २०२४ तसेच शासनाने व माथाडी मंडळाने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याकरिता बाजार समिती, व्यापारी, माथाडी मापारी कामगार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार व्यापाऱ्यांनी रोख स्वरूपात मजुरीची रक्कम जमा करून ठेवण्याबाबत निर्णय घेतलेला होता.
मात्र, बाजार समितीमधील आडते व व्यापारी यांनी दि. १५ जुलै २०२४ पासून कामगारांनी केलेल्या कामाची हमाली व तोलाई कामाची मजुरीची रक्कम कपात करणे बंद केले आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेले आदेश डावलून तसेच जिल्ह्याधिकारी, जिल्हा उपनिबंधक, माथाडी मंडळ यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे उल्लघन होत आहे. सदर मजुरी व लेव्हीच्या प्रलंबित प्रश्नी संघटना व पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांबराेबर वेळोवेळी बैठका घेऊन तडजोडीची भूमिका घेतलेली आहे. याकडे दुर्लक्ष करून व्यापारी तरीही कामगारांना आपल्या हकाच्या मजुरी पासून वंचित ठेवत असल्याने कामगारांच्या मध्ये कमालीचा असंतोष व नाराजी पसरली आहे. त्यामुळे कामगारांनी काम बंद करण्याचे पत्र बाजार समिती प्रशासनाला दिले आहे. पत्रावर लासलगाव बाजार समितीचे कामगार संचालक रमेश पालवे, मुकादम रोटेशन कामगार विठ्ठल कुटे, मुकादम मापारी कामगार संतोष कोल्हे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.