नाशिक : सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना उभारी देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शंभर एकर जागेवर 'एमएसएमई पार्क' उभारण्याचे धोरण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आपल्या शंभर दिवस कृती आराखड्यात नमूद केले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातील वावीजवळ एमआयडीसीकडून शंभर एकर जागेचा प्रस्ताव मुख्यालयात पाठविल्याची माहिती आहे.
एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांनी प्रत्येक जिल्ह्यात एमएसएमई पार्क उभारण्याचा मानस व्यक्त करताना, अधिकाऱ्यांना शंभर एकर जागेचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील विविध भागांत शंभर एकर जागेसाठी चाचपणी केली गेली. मात्र, प्रमुख औद्योगिक वसाहती असलेल्या ठिकाणी एमएसएमई पार्कसाठी जागा उपलब्ध झाली नसल्याने, वावी येथे जागेचा पर्याय दिल्याची माहिती समोर येत आहे. वास्तविक, सिन्नर तालुक्यात सिन्नरसह माळेगाव, मुसळगाव येथे औद्योगिक वसाहत आहे. तर वावी हे प्रमुख व्यापारी केंद्र असून, याठिकाणी औद्योगिक वसाहत नाही. मात्र, एमआयडीसीने यापूर्वीच औद्योगिक वसाहतीच्या दृष्टीने भूसंपादनाची प्रक्रिया राबविल्याने, त्यातीलच जागा 'एमएसएमई पार्क'साठी प्रस्तावित केल्याची माहिती समोर येत आहे.
सिन्नर तालुक्यातील वावी व इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे पर्यटन, कृषी प्रक्रिया व यांत्रिकी अभियांत्रिकीशी संबंधित वसाहती विकसित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) नियोजन करीत असल्याचे २०२३ मध्ये 'निमा'च्या वतीने आयोजित कार्यशाळेत एमएसआरडीसीचे तत्कालीन सहव्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांनी स्पष्ट केले होते. त्याचवेळी या भागात काही जागांचा शाेध घेतला होता.
सिन्नर-शिर्डी महामार्गामुळे वावीची कनेक्टिव्हिटी वाढली आहे. नाशिकसह शिर्डी विमानतळ जवळपास सारख्याच अंतरावर येत असल्याने, एमएसएमई पार्कसाठी वावी चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र, एमएसएमई पार्क जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक वसाहतीमध्येच उभारला जावा, असा एक मतप्रवाह असल्याने वावीचा पर्याय कितपत यशस्वी ठरेल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.