प्रेस मजदूर संघावर सलग पाचव्यांदा कामगार पॅनलची सत्ता Pudhari Photo
नाशिक

Nashik News | प्रेस मजदूर संघावर सलग पाचव्यांदा कामगार पॅनलची सत्ता

विरोधी आपला पॅनलचा सर्व २९ जागांवर पराभव, अध्यक्षपदी जयवंत भोसले बिनविरोध

पुढारी वृत्तसेवा

देवळाली कॅम्प : नाशिक रोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस (आयएसपी) आणि करन्सी नोट प्रेस (सीएनपी) मधील प्रेस मजदूर संघाच्या निवडणुकीत पाचव्यांदा कामगार पॅनलने सत्ता मिळवली. गेल्या 12 वर्षांपासून एकहाती सत्ता मिळवलेल्या कामगार पॅनलने जाहीर झालेल्या निकालानुसार सर्व २९ जागा जिंकत पुन्हा सत्ता हस्तगत करून आपला पॅनलला धूळ चारली.

अध्यक्षपदी जयवंत भोसले हे यापूर्वीच बिनविरोध निवडले गेले आहेत. सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी दणदणीत विजय मिळवला. पॅनलचे यशस्वी नेतृत्व करणारे जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे यांचे अभिनंदन करण्यासाठी रात्री कामगारांची गर्दी उसळली होती. कार्यकारिणीच्या सर्व 16 जागांवरही कामगार पॅनलचेच उमेदवार विजयी झाले. आपला पॅनलचा पराभव झाला. या पॅनलचे नेतृत्व करणारे हरिभाऊ ढिकले, किरण गांगुर्डे, अशोक सुजगुरे आदींनी चांगली लढत दिली. विजयानंतर कामगार पॅनलने गुलाल उधळत, फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. कामगारांनी पुन्हा विश्वास दर्शवत सत्ता दिल्याबद्दल जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे, राजेश टाकेकर, कार्तिक डांगे आदी नेत्यांनी कामगारांचे आभार मानले. हा विजय कामगारांचा असून, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया जगदीश गोडसे यांनी व्यक्त केली. हे सर्व पदाधिकारी मोठ्या फरकाने विजयी झाले.

९५ टक्के मतदान

मजदूर संघाच्या २९ जागांसाठी, तर वर्क्स कमिटीच्या २८ जागांसाठी सुमारे ९५ टक्के मतदान झाले. एकूण १,८०४ मतदार होते. प्रेस मजदूर संघाच्या निवडणुकीत परंपरेनुसार अध्यक्षांची निवड बिनविरोध केली जाते. त्यानुसार संघाच्या अध्यक्षपदासाठी हिंद मजदूर सभेचे नेते जयवंत भोसले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

रात्री उशिरापर्यंत मतमोजणी

या निवडणुकीत कामगार पॅनल आणि आपला पॅनल यांच्यात मुख्य लढत झाली. दोन्ही पॅनलने जोरदार प्रचार केला. प्रेस मजदूर संघाची मतमोजणी रविवारी (दि. २१) सकाळी सुरू झाली, ती रात्री उशिरापर्यंत चालली. यासाठी दोन्ही प्रेसमध्ये प्रत्येकी पाच टेबल लावण्यात आले होते. निवडणूक अधिकारी म्हणून उत्तमराव गांगुर्डे यांनी काम पाहिले. मतमोजणीच्या तिन्ही फेऱ्यांमध्ये कामगार पॅनलने आघाडी घेतली होती.

कामगार पॅनलचे विजयी उमेदवार (निवडणूक चिन्ह विमान)

कार्याध्यक्ष : ज्ञानेश्वर जुंद्रे (१,०५० मते), सरचिटणीस-जगदीश गोडसे (१,०७०).

उपाध्यक्ष (४ जागा) : राजेश टाकेकर (१,०२७), रामभाऊ जगताप (९३६), कार्तिक डांगे (९५७), प्रवीण बनसोडे (८५८).

सहसचिव (६ जागा) : अविनाश देवरूखकर (९९१), बबन सैद (९५९), चंद्रकांत हिंगमिरे (१,०४०), संतोष कटाळे (१,०२०), राजू जगताप (९६४), निवृत्ती कदम (१,००८). खजिनदार- अशोक पेखळे (९६९).

कार्यकारिणी सभासद (१६ जागा) : मनीष कोकाटे, सचिन चिडे, राजेंद्र वारुंगसे, दशरथ बोराडे, समाधान भालेराव, बाळकृष्ण सानप, शंतनु पोटिंदे, संजय गुंजाळ, सतीश चंद्रमोरे, संपत घुगे, रौफ शेख, कांचन खर्जुल, दत्ता गांगुर्डे, विनोद गांगुर्डे, संदीप व्यवहारे, शैलेश जाधव.

कामगारांचा विश्वास हाच विजयाचा आधार: गोडसे

गेल्या 12 वर्षांपासून कामगार पॅनलने कामगारांचा विश्वास संपादन करत त्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याने कामगारांनीदेखील प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना संधी दिली आहे. शासनाचे बदलते धोरण, कामगार कायद्यातील बदल याचा सर्व अभ्यास करून कामगारांच्या पदरात जास्तीत जास्त माप देण्याकरता आपण व सर्व विजयी उमेदवार प्रयत्नशील राहतील, अशी ग्वाही सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT