त्र्यंबकेश्वर (नाशिक) : त्र्यंबक तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा खर्च करून राबवले जाणारे जलजीवन मिशन ग्रामीण भागात शुद्ध पाणी पुरवठा करण्यास अपयशी ठरले आहे. मागील चार वर्षांपासून सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे अद्यापही अपूर्ण असून, महिलांच्या डोक्यावरून हंडे उतरलेले नाहीत.
त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या दोन तालुक्यातील जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार हिरामण खोसकर यांनी त्र्यंबक पंचायत समिती सभागृहात बैठक आयोजित केली होती. त्र्यंबक आणि इगतपुरी तालुक्यात मागच्या तीन वर्षांपासून पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. मात्र एखादा दुसरा अपवाद वगळता सर्व योजना अपूर्ण असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. कोट्यवधी रुपये खर्च झाले असताना अद्यापपर्यंत महिलांच्या डोईवरील हंडे दूर झालेले नाहीत. यासाठी या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीचे प्रास्ताविक किसान सभा जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांनी केले. यावेळी त्यांनी तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची वास्तव स्थिती सभेपुढे मांडली. तालुका पाणी टंचाईने होरपळत आहे. यासाठी योजनांची कामे वेगाने पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. शासन स्तरावरून संबंधित सर्व विभागांचा समन्वय राहावा आणि परस्पर सहकार्याने सर्वसामान्य जनतेचे हाल थांबवावे असे कळकळीने सांगितले.
यानंतर योजनांचा आढावा घेताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने येथे आलेल्या कर्मचारी यांना आपण निघून गेलात तरी चालेल असे सांगितले त्यानंतर त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. वीज वितरण आणि वन विभाग यांची देखील उलट तपासणी घेण्यात आली. पाणी पुरवठा योजनांच्या ठेकेदारांना अडचण काय आहे ? याबाबत विचारणा करण्यात आली.
खासदार वाजे यांनी रखडलेल्या आणि अपूर्ण योजनांचा पाढा वाचला. यामध्ये वाड्या वस्त्या सुटलेल्या असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर तातडीने कामे पूर्ण करा, अशा सूचना करत याबाबत संसदेत लक्षवेधी मांडणार असल्याचे स्पष्ट केले.
आमदार खोसकर यांनी मागच्या तीन महिन्यांत योजनांच्या बाबत कोणतीही प्रगती झालेली नाही. कागदोपत्री चुकीची आणि खोटी माहिती दिली जाते यावर बोट ठेवले. यापुढे ग्रामपंचायत देखील योजनेच्या कामाची तपासणी करेल. जलजीवन मिशनचे काम फेल ठरले आहे, असे म्हणत चुकीची माहिती देणारे अधिकरी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.
पाणीपुरवठा योजना: ८५
अपूर्ण योजना: ६०
बैठकीसाठी ठेकेदार, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वीज वितरण आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, काही अधिकारी गैरहजर राहिले, तर काहींना आवश्यक माहितीच नव्हती, त्यामुळे खासदार व आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या १५ मार्चला त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व तीन गटांसाठी स्वतंत्र आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या वेळी सर्व संबंधित अधिकारी अद्यावत माहितीसह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.