नाशिक : वादग्रस्त शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांच्या कार्यकाळात बेकायदेशीररित्या करण्यात आलेल्या ७० उपशिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात येत असल्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा होती.
शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडत महापालिका शिक्षणाधिकारी पाटील यांच्या गैरकारभाराकडे लक्ष वेधले होते. त्यावरून पाटील यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत चौकशी करण्यात येऊन शासनाला अहवाल सादर करण्यात आला होता. चौकशीतून पाटील यांच्या गैरकारभाराच्या अनेक सुरस कथा उजेडात आल्या होत्या. बेकायदा शिक्षक समायोजन, केंद्रप्रमुखांची नियमबाह्य नियुक्तीबरोबरच उपशिक्षकांच्या बेकायदेशीर बदल्या करण्यात आल्याचे या चौकशीत उघड झाले होते. काही उपशिक्षकांच्या बदल्या तर तोंडी आदेशांद्वारे करण्यात आल्या होत्या. याबाबत शाळांच्या मुख्याध्यापकांकडून प्राप्त माहिती आणि कार्यालयीन दस्तऐवजांवरून संबंधित ७० उपशिक्षकांच्या शेरेबुकात तसेच आयुक्त तथा प्रशासकांची मान्यता न घेताच बदल्या करण्यात आल्याचे उघड झाले. केवळ तोंडी आदेशानुसार २१ शिक्षकांच्या तर सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता न घेता ४९ बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बेकायदा शिक्षक समायोजन आणि केंद्रप्रमुखांना दिलेल्या बेकायदा पदोन्नती रद्द करतानाच उपशिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या देखील रद्द करण्याचे आदेश आयुक्त मनिषा खत्री यांनी जारी केले आहेत.
बदल्या रद्द करण्यात आल्यानंतर संबंधित शिक्षकांना तत्काळ पूर्वीच्या जागी हजर होण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशांचे पालन न केल्यास संबंधित शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. शिक्षकांचे मासिक वेतन त्यांच्या पूर्वीच्या शाळेतूनच काढले जाणार आहे. तसे संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचित करण्यात आले आहे.