नाशिक : विकास गामणे
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचे मोठे नुकसान झाले असून, एकूण 157 किलोमीटर रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यात त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, इगतपुरी या आदिवासी तालुक्यांतील रस्त्यांची सर्वाधिक, तर निफाड तालुक्यातील रस्त्यांचीही चाळण झाली आहे. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज असल्याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने 145 कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. यात रस्ते दुरुस्तीला किती निधी मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले रआहे.
यंदा मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. ही समाधानाची बाब असली तरी जिल्ह्यातील अनेक गावांत अतिवृष्टीमुळे खरिपाचे पर्यायाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. गोदावरी नदीला पाच वेळा पूर आला. महापुराने चांदोरी, सायखेडा गावात पाणी शिरले होते. काही गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याने मोठी हानी झाली. निफाड व येवला तालुक्यात यंदा अतिवृष्टीने मोठा फटका बसला आहे.
या अतिवृष्टीचा जिल्ह्यातील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांनाही मोठा फटका बसला असून, जिल्हा परिषदेमार्फत बांधण्यात आलेले रस्ते, छोटे पूल व छोटे-मोठे बंधार्यांचेही नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. अतिवृष्टीमुळे ज्या रस्ते, पूल व छोट्या-मोठ्या पुलांना हानी पोहोचली आहे. त्यांच्या नुकसानीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या बांधकाम एक, दोन व तीन विभागाने तयार केला आहे. तिन्ही विभाग मिळून 131 किलोमीटरचे ग्रामीण मार्ग, तर 26 किलोमीटरचे इतर जिल्हा मार्गावरील रस्त्यांचे नुकसान झाले आहे. या रस्त्यांच्या तात्पुरती दुरुस्तीसाठी 24.05 कोटी तर, कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी 120.95 कोटींची आवश्यकता आहे. त्याबाबतचा प्रस्ताव बांधकाम विभागाने शासनाला सादर केला आहे. दिवाळीनंतर रस्ते दुरुस्ती कामाला खर्या अर्थाने वेग येणार आहे.
यंदा झालेल्या पाऊस, अतिवृष्टी अन् महापुराने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ररस्त्यांच्या नुकसानाचा प्रस्ताव तालुकापातळीवरून मागविला होता. यात ग्रामीण मार्ग 131 किलोमीटर तर, 26 कि.मी. इतर जिल्हा मार्गावरील रस्त्यांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी 145 कोटींचा दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे.संदीप सोनवणे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग 1 जिल्हा परिषद
आदिवासी तालुक्यांतील रस्त्यांना सर्वाधिक नुकसान
जिल्ह्यातील आदिवासी तालुके असलेल्या पेठ, दिंडोरी, सुरगाणा, कळवण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, देवळा, सटाणा या तालुक्यांतील रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागांतील अंतर्गत रस्त्यांची हानी झालेली आहे. बिगर आदिवासी तालुक्यातील रस्त्यांचे नुकसान तुलनेने कमी आहे. मात्र, निफाड तालुक्यातील रस्त्यांची हानी मोठी आहे.