नाशिक : विकास गामणे
मागील काही वर्षांपासून खासगी रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण वाढलेले असतानाच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अजूनही नैसर्गिक प्रसूतीला प्रधान्य दिले जात आहे.
जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांत मागील पाच वर्षांत सुमारे 2 लाख 13 हजार 765 महिलांची प्रसूती झाली असून यात तब्बल 1 लाख 82 हजार 319 (85 टक्के) प्रसूती या नैसर्गिक झाल्या आहेत, तर 31 हजार 446 (15 टक्के) प्रसूती सिझेरियनद्वारे झाल्या आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून प्राप्त आकेडवारीतून ही बाब समोर आली आहे. प्रत्येक महिलेच्या आयुष्यात प्रसूती हा अत्यंत आनंदाचा क्षण असतो. त्यामुळे गर्भधारणनेनंतर चांगले उपचार मिळण्याचा प्रयत्न असतो. परिणामी, अनेक जणींकडून प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयांना प्राधान्य दिले जाते. मात्र, त्या ठिकाणी सिझेरियन झाल्यास लाखो रुपयांचा खर्च येतो. सामान्यांना हा खर्च परवडणारा नाही. काहीवेळा महिला नाजूक असल्याने तसेच काही अडचणी असल्यास सिझेरियनशिवाय पर्याय नसतो. दुसऱ्या बाजूला योग्य ती काळजी घेतल्यास ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, महिला रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय यांमध्ये अगदी मोफत प्रसूती होऊ शकते हे गत पाच वर्षांतील आकेडवारीतून स्पष्ट झाले आहे.
ग्रामीण भागात 2020- 21 मध्ये 37 हजार 553 महिला प्रसूती झाल्या. त्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांत 33 हजार 364 प्रसूती नैसर्गिक झाल्या आहेत. 2021-22 मध्ये 42 हजार 603 महिला प्रसूती झाल्या असून यात 6 हजार 31 हे सिझेरियन तर, 36 हजार 572 नैसर्गिक प्रसूती झाल्या आहेत. 2022-23 मध्ये एकूण 46 हजार 508 प्रसूती झाल्या आहेत, त्यातील 39 हजार 880 प्रसूती या नैसर्गिकरीत्या झाल्या आहेत. 2023-24 मध्ये 7 हजार 166 सिझेरियन आणि 37 हजार 512 नैसर्गिक प्रसूती झाल्या आहेत. 2024- 25 मध्ये एकूण 42 हजार 423 प्रसूती झाल्या असून यात 34 हजार 991 प्रसूती नैसर्गिक झाल्या आहेत.
प्रत्येक गर्भवतीचे आरोग्य चांगले राहावे तसेच बाळाची व्यवस्थित वाढ व्हावी, बाळ कुपोषित असू नये तसेच सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी शासनाकडून जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, पंतप्रधान मातृवंदना योजना, माहेरघर योजना, मानवविकास कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याचा फायदाही या महिलांना होत आहे. खासगी रुग्णालयात नैसर्गिक प्रसूतीसाठी सुमारे ३० ते ३५ हजार आणि सिझेरियनसाठी सुमारे ५० हजार ते ८० हजारांपर्यंत खर्च होतो
गर्भवतींसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी सुरू आहे. प्रसूतीपूर्वी आणि नंतरही आरोग्य केंद्रात चांगली आरोग्य सेवा दिली जाते. त्यामुळे आजही ग्रामीण भागात महिला नैसर्गिकरित्या प्रसूती होत आहेत.डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद. नाशिक.