चांदवड : चांदवड तालुक्यातील ६१ हजार ४७६ लाभार्थ्यांचे १०४ कोटी ५ लक्ष ३३ हजार ३३ रुपये व देवळा तालुक्यातील ३६ हजार १२७ लाभार्थ्याचे ५७ कोटी ८४ लक्ष ९५ हजार ४११ रुपये ही रक्कम देण्यास द ओरीयंटल इन्शुरन्स विमा कंपनी तयार झाली आहे. लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर सदर रक्कम जमा होणार असल्याची माहिती आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली.
मागील वर्षापासून शासनाने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पिकविमा योजना अवघ्या १ रुपयात उपलब्ध करून दिला आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना पिकविमा काढण्यासाठी स्वखर्चाने पिक विमा हप्ता भरणे बंधनकारक होते. आता शेतकऱ्यांची अडचण ओळखुन केंद्र शासन व राज्य शासन हप्त्याची रक्कम अदा करते. त्यामुळे १ रुपयात शेतकऱ्याला पिकविमा उपलब्ध होतो. मागील खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पिकविमा योजने अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील ५ लाख ९१ हजार ५९९ इतक्या शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. यात चांदवड तालुक्यातील ६१ हजार ४७६ व देवळा तालुक्यातील ३६ हजार १२७ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यात अत्यल्प पावसामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेती उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पिकविमा भरपाईस पात्र झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील ५,९१,५९९ अर्जदारांचे ८५३ कोटी २३ लक्ष ८८ हजार ६९१ रुपये नुकसान भरपाई येणे प्रलंबित आहे. यात चांदवड तालुक्यातील ६१ हजार ४७६ लाभार्थ्यांच्या १०४ कोटी ५ लक्ष ३३ हजार ३३ रुपये तसेच देवळा तालुक्यातील ३६ हजार १२७ लाभार्थ्याचे ५७ कोटी ८४ लक्ष ९५ हजार ४११ रुपये हि रक्कम देण्यास द ओरीयंटल इन्शुरन्स विमा कंपनी तयार झाली आहे. त्यांचे शासनाकडील सर्व अपिल फेटाळण्यात आले आहे. विमा कंपनीचा देय हप्ता देखील राज्य शासन व केंद्र शासनाने जमा केला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
चांदवड व देवळा तालुक्यातील सर्व पिकविमा धारक शेतकरी नुकसान भरपाईस पात्र झालेले आहेत व कुणीही भरपाई पासून वंचित राहणार नाही. दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या पिकांची पूर्ण नुकसान भरपाई लवकरच मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संभ्रम करून घेऊ नये असे आवाहन आ. डॉ. राहुल आहेर यांनी केले. लवकरात लवकर पिकविम्याचे पैसे मिळावे यासाठी पिकविमा कंपनी व राज्यशासन यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करणार असल्याचे देखील आ. डॉ. राहुल आहेर यांनी सांगितले.