लासलगाव : राकेश बोरा
भारताने एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या ११ महिन्यांच्या कालावधीत ५४.२५ लाख मेट्रिक टन बासमती तांदळाची निर्यात करून ४५,५१० कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त केले आहे. ही कामगिरी भारतीय शेती, अन्नप्रक्रिया उद्योग आणि जागतिक बाजारात भारताच्या स्थानाला बळकटी देणारी आहे.
भारतातून निर्यात होणाऱ्या बासमती तांदळाने जागतिक बाजारात विक्रमी झेप घेतली आहे. जगातील एकूण बासमती तांदळाच्या निर्यातीपैकी तब्बल ७० टक्के हिस्सा भारताकडे आहे. २०२१-२२ च्या तुलनेत २०२३-२४ या आर्थिक वर्षात १४.९३ टक्क्यांनी निर्यात वाढली असून, निर्यात किमतींमध्येही २२.०५ टक्क्यांची लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे.
भारतीय पारंपरिक आहारातील एक खास स्थान असलेला बासमती तांदूळ आता युरोप, अमेरिका आणि आखाती देशांतील घराघरांत पोहोचला आहे. आरोग्यविषयक जागरूकतेमुळे नैसर्गिक, स्थानिक व पारंपरिक अन्नपदार्थांची मागणी वाढली असून, त्याचा थेट फायदा भारताला होत आहे.
भारतीय कृषी व प्रक्रिया अन्न निर्यात प्राधिकरण (अपेडा) सारख्या संस्थांनी गुणवत्ता आणि विश्वासार्हतेवर भर देत भारतीय बासमतीला जागतिक पातळीवर ओळख निर्माण करून दिली आहे. सध्या अनेक भारतीय कंपन्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून थेट परदेशी ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत. यामुळे अनिवासी भारतीयांबरोबरच आंतरराष्ट्रीय ग्राहकांकडूनही बासमती तांदळाची मागणी झपाट्याने वाढत आहे.
जागतिक किंमत स्थिरता, युरोपियन युनियनसारख्या बाजारपेठांमध्ये कठोर नियम, हवामान बदलामुळे कृषी उत्पादनात व्यत्यय या अडथळ्यांवर मात करण्यासाठी, भारताला त्याची गुणवत्ता सुधारणे, ब्रँडिंगमध्ये गुंतवणूक करणे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच, बासमतीला केवळ धान्य म्हणूनच नव्हे तर भारतीय वारसा आणि पाककृतीची उत्कृष्टता म्हणून सादर करण्याची गरज आहे.सचिन होळकर, कृषितज्ज्ञ, लासलगाव, नाशिक.
भारताने आपल्या पारंपरिक बाजारपेठा, मध्य पूर्व आणि यूकेच्या पलीकडे जाऊन आफ्रिका, आग्नेय आशिया आणि लॅटिन अमेरिका सारख्या नवीन बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. यामुळे निर्यातीच्या नवीन संधीही खुल्या होतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.