नाशिक : दिलीप सूर्यवंशी
आदिवासी विकास विभागातील 497 शासकीय, अनुदानित आश्रमशाळांमधील सुमारे 2 लाख विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून जेवण पुरविले जाते. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील सेंट्रल किचनद्वारे नाशिक विभागातील 45 आदिवासी आश्रमशाळांमधील सुमारे 14 हजार विद्यार्थ्यांना सकाळचा नाश्ता, माध्यान्ह भोजन आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा पुरविली जाते.
अलीकडेच इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी मुंढेगाव येथील सेंट्रल किचनच्या जेवणावर आक्षेप नोंदविला होता. निकृष्ट जेवणाचा हा विषय संपूर्ण विभागात गाजला. सद्यस्थितीत मुंढेगाव सेंट्रल किचनची काय स्थिती आहे, याचा दैनिक 'पुढारी'ने आढावा घेतला आहे. मुंढेगाव येथील सेंट्रल किचनमध्ये एकूण 140 कामगार दररोज जेवण तयार करण्याचे काम करतात. किचनमधील अन्ननिर्मिती प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे एकूण 22 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इतर 118 कर्मचारी हे कंत्राटी कामगार आहेत. सेंट्रल किचनमधून नाशिकमधील सिन्नर, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर येथील आश्रमशाळांना, तर अहिल्यानगरमधील राजूर तालुका आणि पालघरमधील मोखाडा तालुक्यातील आश्रमशाळांना जेवणाचा पुरवठा केला जातो. एकूण 17 मार्गांवरील 45 शाळांना गत 9 वर्षांपासून जेवणाचा पुरवठा केला जात आहे.
नाश्ता, जेवण तयार करण्यासाठी तीन शिफ्ट सकाळचा नाश्ता, दुपारचे अन् सायंकाळचे जेवण तयार करण्यासाठी तीन शिफ्टमध्ये काम चालते. सकाळचा नाश्ता बनविण्याचे काम रात्री 1 वाजता सुरू होते. पहाटे 4 पर्यंत नाश्ता तयार केला जातो. 4 पासून गाड्यांद्वारे नाश्ता पाठविला जातो. शेवटची गाडी 6 वाजता सुटते. सकाळी साडेसात वाजता आदिवासी विद्यार्थ्यांना नाश्ता दिला जातो. दुपारचे जेवण मुलांना साडेबारा वाजता दिले जाते. यासाठी सकाळी 7 वाजता जेवणाची तयारी केली जाते. 10 पर्यंत जेवण तयार करून गाड्या रवाना होतात. तर सायंकाळचे जेवण 7 वाजता दिले जाते. यासाठी 4 पर्यंत जेवण तयार केले जाते. 120 किलोमीटरपर्यंत गाड्या जेवण घेऊन जातात.
भाजीपाला, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गॅस, किराणा माल, अल्पोपाहारचे पदार्थ आदी कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी 24 पुरवठारदारांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यावर 3 कंट्रोलर नेमण्यात आले आहेत. स्वयंपाक चालू करण्याच्या अगोदर, स्वयंपाक झाल्यानंतर स्वच्छता करण्यात येते.
गुणात्मक दर्जाच्या डायर्व्हसिटी केमिकलद्वारे महिला कर्मचाऱ्यांकडून दररोज संपूर्ण किचनची स्वच्छता केली जाते. शाळेतून आलेल्या भांड्यांची देखील स्वच्छता केली जाते. भांडी स्वच्छ केल्यानंतर पुन्हा स्टीमच्या सहाय्याने निर्जंतूक केली जाते. यानंतर अन्नपदार्थ भरण्यासाठी भांडी पाठविली जातात. पेस्ट कंट्रोलद्वारे परिसराची स्वच्छता केली जाते.
गाड्यांना वेळेत जेवण घेऊन जाणे बंधनकारक आहे. साधारणत: 105 किलोमीटरचे अंतर गाडीला अडीच तासात कापावे लागते. प्रत्येक गाडीला जीपीएस यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. यामुळे रुटवर गाडी कुठे आहे हे कंट्रोलरुममध्ये समजते. गाडीत उष्णतारोधक वातावरण तयार केलेले आहे. उष्णतारोधक व्हेसल्समध्ये जेवण पोहोचविले जाते.
गव्हाचे पीठ स्वयंचलित यंत्राद्वारे मळले जाते. मळलेले पीठ चपाती मेकिंग मशिनमध्ये टाकून पीठाचे छोटे गोळे तयार केले जातात. वजनाद्वारे दाब देऊन पीठाच्या गोळ्याचे पोळीत रुपांतर केले जाते. आलटून पालटून दोन वेळा पोळीला शेक दिला जातो तर तिसऱ्यांना पोळीला भाजले जाते. मशिनद्वारे 1 तासात 2800 पोळ्या तयार केल्या जातात.
सेंट्रल किचनच्या आवारात पाणी, रॉ- मटेरिअल तपासणीसाठी स्वतंत्र लॅबची निर्मिती करण्यात आली आहे. लॅबद्वारे दररोज पाण्याची शुध्दता आणि किचनमध्ये आलेल्या रॉ- मटेरिअलची तपासणी करणे बंधनकारक आहे. कटींग मशीनद्वारे बटाटे, भोपळा, कोबी, काकडी आदी फळभाज्या कटींग गेल्या जातात तर 14 मिनिटांत 720 अंडी बॉइल होतात.
नाशिक- विभाग
सिन्नर - 3
पेठ - 6
दिंडोरी - 10
त्र्यंबकेश्वर - 10
इगतपुरी - 8
अहिल्यानगर जिल्हा
राजूर - 9
पालघर जिल्हा
मोखाडा - 2
एकूण 45 शाळा