नाशिक : नगरपालिका काळापासून अस्तित्वात असलेली रविवार कारंजा परिसरातील यशवंत मंडईची जीर्ण इमारत अखेर पाडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. ही धोकादायक इमारत पाडकामासाठी महापालिकेच्या जाहिरात व परवाने विभागाने बांधकाम विभागाला पत्र सादर केले आहे. इमारत पाडकामासाठी बांधकाम विभागामार्फत निविदाप्रक्रिया राबवून एजन्सी निश्चित केली जाणार आहे. इमारतीतील २४ भाडेकरूंना आपली मालकी तसेच इमारत धोकादायक नसल्याचे सिद्ध करता आले नसल्यामुळे न्यायालयाने इमारत पाडकामाची महापालिकेची कार्यवाही योग्य ठरविली आहे.
यशवंत मंडईच्या जागेवर बहुमजली वाहनतळ उभारण्याची महापालिकेची योजना आहे. या इमारतीचे वयोमान ५५ वर्षांहून अधिक झाल्याने ही इमारत धोकादायक झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने इमारत रिकामी करण्यासंदर्भात तेथील २४ भाडेकरूंना नोटिसा बजावल्या होत्या. महापालिकेच्या या कारवाईविरोधात काही भाडेकरूंनी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाच्या निर्देशांनुसार महापालिकेने मविप्रच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत यशवंत मंडईचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. त्यात इमारत धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले. तसेच दावा दाखल केलेल्या भाडेकरूंना आपली मालकीदेखील सिद्ध करता आली नसल्याने महापालिकेची कारवाई न्यायालयाने योग्य ठरविली. त्यामुळे महापालिकेने भाडेकरूंना अंतिम नोटिसा बजावत इमारत रिकामी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कर, जाहिरात व परवाने विभागाचे उपायुक्त श्रीकांत पवार बांधकाम विभागाला पत्र पाठवत यशवंत मंडई इमारत रिकामी करण्यासंदर्भातील योग्य ती कार्यवाही आपल्या विभागामार्फत करण्यात यावी, अशी सूचना केली आहे. त्यामुळे आता बांधकाम विभागानेदेखील इमारतीचे पाडकाम करण्यासाठी त्या क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञ कंपनी वा संस्थेची नेमणूक करण्याकरिता निविदा प्रक्रियेची तयारी सुरू केली आहे.
जाहिरात व परवाने विभागाकडून इमारत पाडकामासंदर्भातील पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून इमारत रिकामी करण्यासाठीची कार्यवाही केली जाणार आहे.संजय अग्रवाल, शहर अभियंता, मनपा