Security Guards  Pudhari
नाशिक

Nashik security guards| महिला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी आता महिला सुरक्षा रक्षक

राज्यातील ४८ बसस्थानकांवर अंमलबजावणी सुरू, ७०६ घटनांत बजावली कठोर भूमिका

पुढारी वृत्तसेवा

धनराज माळी

नाशिक : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांची सुरक्षा, विशेषतः महिला प्रवाशांची सुरक्षितता सर्वतोपरी मानून महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता खात्यामार्फत महामंडळाच्या ४८ बसस्थानकांवर महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे.

महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता खात्याच्या माध्यमातून, महिला सुरक्षा रक्षकांनी प्रवाशांची सुरक्षा, घातपातापासून दक्षता, सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांबद्दल जागरूकता आणि प्रवाशांना मदत करणे ही महत्त्वपूर्ण कामे हाती घेतली आहेत. त्यानुसार जानेवारी २०२५ पासून आतापर्यंतच्या या कालावधीत सर्व स्थानकांवर पाकीटमार, चोरी, महिला छेडछाड, घर सोडून आलेल्या महिलांना मदत, मनोरुग्णांना मदत अशा ७०६ घटनांत महिला सुरक्षा रक्षकांनी अत्यंत प्रामाणिक व जबाबदारीने कामगिरी केली आहे. त्यातील ३० प्रकरणांत गुन्हे नोंद झाले आहेत.

प्रवाशांत सुरक्षिततेची भावना

सुरक्षा व दक्षता खात्यामार्फत या कामगिरीचा सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. सुरक्षा रक्षकांना अधिक दक्ष राहण्याबाबत व आपली कामगिरी सुधारण्याबाबत वारंवार सूचना देण्यात येतात. त्यानुसार, सुरक्षा रक्षकांकडूनही कार्यक्षम आणि दक्षतेची कामगिरी सातत्याने केली जात आहे. परिणामी, सुरक्षा रक्षकांनी व महिला सुरक्षा रक्षकांनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होणाऱ्या घटनांना प्रभावीपणे आळा घालण्यात महामंडळाला यश प्राप्त होऊ लागले आहे. या सकारात्मक आणि प्रभावी कार्यवाहीमुळे महिला प्रवासी आणि विद्यार्थिनींमध्ये सुरक्षिततेची दृढ भावना निर्माण झाली आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ एसटीचे घोषवाक्य महामंडळ योग्य प्रकारे जतन करत असल्याचे यातून स्पष्टपणे दिसून येते.

या कालावधीत १८२ प्रकरणांत महिलांची छेडछाड, विद्यार्थिनींची छेडछाड, महिलांचे दागिने, पैसे चोरणे, मनोरुग्ण महिलांना व घर सोडून आलेल्या महिलांना मदत पुरवणे अशा विविध गुन्हेगारी व सामाजिक स्वरूपाच्या घटनांना सुरक्षा रक्षक व महिला सुरक्षा रक्षकांनी अत्यंत दक्षतेने हाताळून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

भामटे व टवाळखोरांवर करडी नजर

बसस्थानक म्हटले की गर्दी - वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. या गर्दीचा फायदा घेऊन टवाळखोर मुली-महिलांची छेडखानी करतात. महिलांच्या दागिन्यांवर चोरटे टपूनच बसलेले असतात. पाकीट, पर्स लांबवतात. यासाठी महिला सुरक्षा रक्षक आता महिला-मुलींची गर्दी असलेल्या ठिकाणी करडी नजर ठेवून असतात. त्यामुळे घटनांवर अंकुश बसला आहे. वेळप्रसंगी भामट्यांना पकडून चोप देण्यासही महिला रक्षक मागे-पुढे पाहत नाहीत. त्यांना पुरुष सुरक्षा रक्षकांचीही मदत मिळते. त्यामुळे एसटी प्रशासनाचा हा महिला सुरक्षिततेसाठीचा उपक्रम यशस्वी ठरला आहे.

हिरकणी कक्ष ठरतोय वरदान

लहान बाळ असलेल्या महिलांना प्रवासात बसस्थानकावर आपल्या बाळाला स्तनपान करता यावे, म्हणून शासनाने प्रत्येक बसस्थानकावर महिलांसाठी हिरकणी कक्षाची स्थापना केली आहे. हे हिरकणी कक्ष महिलांसाठी वरदान ठरत आहे. अनेकदा लहान बालके प्रवासात दुधासाठी रडतात. मात्र, महिलांना बाळाला उघड्यावर दूध पाजणे योग्य वाटत नाही. त्यामुळे बाळ भुकेने व्याकुळ होऊन रडत असते. ही गरज लक्षात घेऊन हा हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याचा महिला प्रवासी लाभ घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT