कळवण (नाशिक) : तालुक्यात शेतकामासाठी गेलेला शेतमजूर घरी न परतल्याने त्याचा घातपात झाल्याच्या संशयावरून संतप्त नातेवाईकांनी शुक्रवार (दि. ३) रात्री कळवण शहरातील मुख्य रस्त्यावर पोलिस ठाण्यासमोर रास्तारोको करत ठिय्या आंदोलन केले. मात्र, तरीही तपास न लागल्याने शनिवार (दि. ४) नातेवाईकांचा संयम सुटल्याने सकाळी अकराच्या सुमारास संतप्त जमावाने पोलिस ठाण्यावर दगडफेक केली. विठोबा गुलाब पवार (३५) असे बेपत्ता शेतमजुराचे नाव आहे.
या दगडफेकीत काही पोलिस कर्मचारी आणि वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांनाही किरकोळ दुखापत झाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले.
या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिस निरीक्षक खगेंद्र टेम्भेकर, सहाय्यक निरीक्षक बबनराव पाटोळे आणि पोलिस अधिकारी बोरसे यांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता.
बेपत्ता शेतमजुर विठोबा पवार याची आई सावित्रीबाई गुलाब पवार हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विठोबा हा शेतकरी बापू त्र्यंबक शिंदे (रा. कळवण खुर्द) यांच्याकडे शेतमजूर म्हणून काम करीत होता. त्याने शिंदे यांच्याकडून ३५ हजार रुपये उचल म्हणून घेतले होते. अलीकडे तो गावातीलच संजय शेवाळे यांच्याकडे काम करू लागला होता. त्यामुळे शिंदे यांनी त्याच्याकडून उचल परत मागितली होती.
तीन ऑक्टोबर रोजी बापू शिंदे यांनी विठोबाला घरी येऊन शेतकामासाठी नेले. काम आटोपल्यानंतर विठोबा संजय शेवाळे यांच्या शेतात गेला. त्यावेळी बापू शिंदे आणि त्यांचा मुलगा राहुल शिंदे यांनी रागाच्या भरात त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी संजय शेवाळे यांच्या घरातच लाथाबुक्यांनी मारहाण करून त्याचे अपहरण केले आणि त्याच्या जीवितास धोका पोहोचविला, असा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. या प्रकरणामुळे कळवण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी या घटनेचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
----
-----
फोटो - बेपत्ता विठोबा पवार
छाया उमेश सोनवणे