bridge news 
नाशिक

Nashik bridge news | दत्त मंदिर ते द्वारका डबल डेकर उड्डाणपूल रखडणार

मंजुरीची प्रतीक्षा कायम; कुंभमेळ्यानंतरच कामाला प्रारंभ होण्याचे संकेत

पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड : परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित दत्त मंदिर ते द्वारका डबल डेकर उड्डाणपूल प्रकल्प अद्यापही मंजुरीच्या प्रतीक्षेत असून, या कामाला सिंहस्थ कुंभमेळ्यानंतरच सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. याबाबत माहिती देताना खा. राजाभाऊ वाजे यांनी केंद्रस्तरावरून तसे संकेत मिळत असल्याचे सांगितले.

माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यकाळात सुमारे ७०० कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाचा आणि सुरुवातीला ७ किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल जाहीर करण्यात आला होता. मात्र, अद्याप अंतिम प्रशासकीय मंजुरी मिळाली नसल्याने प्रकल्प रखडलेला आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असून, कुंभमेळ्याच्या कामांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून सध्या प्रकल्प पुढे ढकलण्यात आल्याचे संकेत दिसून येत आहेत. नाशिकरोड परिसरात सिन्नर फाटा, बिटको चौक, दत्त मंदिर, उपनगर, आंबेडनगर, गांधीनगर, फेम सिनेमा सिग्नल, काठे गल्ली ते द्वारका या भागांत दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांना शहरात न शिरता थेट बाहेर पडता यावे आणि स्थानिक नागरिकांची कोंडी टाळावी, या उद्देशाने हा डबल डेकर उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला होता.

२०१४ मध्ये केंद्रीय सागरमाला योजनेंतर्गत प्रकल्पास मंजुरी जाहीर झाली होती. दत्त मंदिर येथे या प्रकल्पाचे भूमिपूजनही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर प्रकल्पाची लांबी ७ किमीवरून ८ किमी करण्याचा निर्णय घेऊन तो थेट सारडा सर्कलपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही.

खा. राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडे पाठपुरावा केला असता, कुंभमेळ्यापूर्वी काम पूर्ण होणे शक्य नसल्याने प्रकल्प कुंभमेळ्यानंतर हाती घेण्याचे नियोजन असल्याचे उत्तर मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नाशिककरांचे बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे स्वप्न सध्या तरी अधांतरीच राहणार असल्याचे चित्र आहे.

"आम्ही या पुलाबाबत प्रशासनासोबत कायम पाठपुरावा करत आहोत. अद्यापही या पुलाला मंजुरी मिळालेली नाही. उड्डाणपुलाचे काम कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे कुंभमेळ्यानंतरच या प्रकल्पाचे नियोजन करण्यात येईल, असे केंद्रीय स्तरावरून कळविण्यात आले आहे."
-राजाभाऊ वाजे, खासदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT