नाशिक : अंमली नशा करीत परप्रांतीय तरुणीने भररस्त्यात नागरिकांसमोर गोंधळ घातल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. १५) रात्री मुंबई-आग्रा महामार्गावरील इंदिरानगर बोगद्याजवळ घडला. सोशल मीडियावर तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो चर्चेचा विषय बनला. मात्र, हद्दीच्या वादातून शुक्रवारी दुपारपर्यंत या तरुणीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. अखेर अंबड पोलिसांनी संबंधित तरुणीस नोटीस बजावत प्रकाराची दखल घेतली.
इंदिरानगर बोगद्याजवळ अंदाजे २२ ते २५ वयोगटातील तरुणी नशेच्या अंमलाखाली रस्त्यावरच गोंधळ घालत असल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला. त्यामुळे परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. तरुणी नशेत अर्वाच्य बोलत होती. ‘चलो हॉस्पिटल, मेडिकल करते हैं… मेडिकल में पता चलेगा कौन पिया है…’ असे बोलत तरुणीने नागरिकांनाच आवाहन केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तेथे दाखल झाले, मात्र तरुणी तेथून दिसेनाशी झाली होती. हा प्रकार मुंबई नाका व अंबड पोलिसांच्या हद्दीच्या सीमारेषेवर घडल्याने हद्दीचा वाद पहावयास मिळाला.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाशिककरांनी कारवाईची मागणी केली. मात्र, पोलिसांनी दुपारपर्यंत यासंदर्भात कोणतीही दखल घेतली नव्हती. अखेर मुंबई नाका पोलिसांनी तरुणीचा शोध घेत तिला अंबड पोलिसांच्या ताब्यात दिले. तर सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी तरुणीवर प्रतिबंधात्मक कारवाई करून अंबड पोलिसांनी तरुणीस नोटीस बजावली आहे. पोलिसांच्या तपासात २५ वर्षीय तरुणी काही महिन्यांपूर्वीच शिक्षणासाठी पश्चिम बंगाल येथून नाशिकमध्ये वास्तव्यास आल्याचे समोर आले आहे.
गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रसाद सर्कल येथे चार तरुण-तरुणींनी मद्यसेवन करीत पोलिसांशी हुज्जत घातली होती. तरीदेखील गंगापूर पोलिसांनी कारवाई केली नव्हती. सोशल मीडियावर यासंदर्भात व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. त्याचप्रमाणे गुरुवारी देखील नशेतील तरुणीविरोधात पोलिसांनी वेळीच दखल घेतली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांकडून होणारे दुर्लक्ष नशेखोरांच्या पथ्यावर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.