नाशिक : आसिफ सय्यद
रस्त्यांवरील खड्ड्यांविषयी नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण जलदगतीने करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे तक्रार निवारण प्रणाली (पीसीआरएस) विकसित केली आहे.
या प्रणालीचा प्रभावीपणे वापर होण्यासाठी नागरिकांकरिता 'पीसीआरएस ॲप' तर नागरिकांकडून या ॲपवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी सार्वजिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता 'माय पीडब्ल्यूडी ॲप' उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, या ॲपच्या माध्यमातून रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत नागरिकांच्या तक्रारींचे तीन दिवसांत निराकरण केले जाणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्यात १.१८ हजार किलोमीटरपेक्षा अधिक लांबीच्या रस्त्यांचे जाळे तयार करण्यात आले आहे. यात प्रमुख राज्यमार्ग, राज्य महामार्ग व प्रमुख जिल्हा रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांची सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नियमित देखभाल व दुरुस्ती केली जाते. सर्वसाधारणपणे पावसाळ्यानंतर रस्त्यांवर खड्डे पडतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्ड्यांविषयीच्या तक्रारींचे निराकरण जलदगतीने होण्यासाठी खड्डे तक्रार निवारण प्रणाली (पीसीआरएस) विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीच्या वापरादरम्यान उद्भवलेल्या अडचणींवरून ॲप्लिकेशनमध्ये सुधारणा करून तक्रार नोंदविण्याच्या गतिमानतेमध्ये वाढ करण्यासाठी नागरिकांसाठी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी दोन स्वतंत्र मोबाइल ॲप विकसित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नागरिकांकडून पीसीआरएस ॲपच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करावयाच्या कार्यवाहीसाठी माय पीडब्ल्यूडी ॲपची प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नागरिकांकडून पीसीआरएस ॲपच्या माध्यमातून सादर होणाऱ्या तक्रारींवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तक्रार निवारणाची कार्यवाही जलद होण्याच्या दृष्टीने या प्रणालीमध्ये दक्ष व्यवस्था अर्थात अलर्ट सिस्टीम निर्माण करण्यात आली आहे. संबंधित शाखा अभियंत्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही जास्तीत जास्त तीन दिवसांत पूर्ण करावी लागणार आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांनंतर उपअभियंता, १५ दिवसांनंतर कार्यकारी अभियंता, तर ३० दिवसांनंतर अधीक्षक अभियंत्यांना अलर्ट संदेश दिला जाणार आहे.
नागरिकांना रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत तक्रारींसाठी मोबाइलवर गुगल प्ले स्टोअर, केंद्र शासनाचे एम-सेवा पोर्टल अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकेतस्थळावरून 'पीसीआरएस' ॲप मोबाइलवर डाउनलोड करावा लागेल. त्यावर मोबाइल क्रमांक व त्या क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या ओटीपीची नोंदणी केल्यानंतर खड्ड्यांबाबत तक्रार नोंदविता येईल. रस्त्यावरील खड्ड्याचे छायाचित्र अपलोड करता येईल. नागरिकांकडून नोंदविलेली तक्रार क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे फॉरवर्ड केली जाईल. नागरिकांना तक्रारीचा क्रमांक दिला जाईल. त्या क्रमाकांवर तक्रारीची सद्यस्थिती तपासणीची सुविधा आहे.