नाशिक : जिल्हा रुग्णालय, नाशिक येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे ३ कोटी ३७ लाख रुपयांचे कंत्राट दिल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्यासह आठ जणांविरोधात फसवणूकीसह अपहाराचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
संदीप बाळकृष्ण मेटकर यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणात डॉ. निखिल सौंदाणे, डॉ. उत्कर्ष दुथे, डॉ. राहुल हडपे, सागर दिलीप चोथवे, अश्विनी सागर चोथवे आणि दिलीप राणूजी चोथवे यांना या गुन्ह्यात सहआरोपी केले आहे.
पोलीस तपासात समोर आले आहे की, औषध निर्माण अधिकारी शिरीष माळी यांनी दंतयांत्रिकी सागर चोथवे, त्यांची पत्नी अश्विनी चोथवे आणि वडील दिलीप चोथवे यांच्याशी संगनमत करून क्रेननोवेटिव्ह पॉवरटेक प्रा. लि. या कंपनीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली. त्यानंतर या कागदपत्रांमध्ये औषध परवाना, वार्षिक उलाढाल आणि अनुभव प्रमाणपत्रांचा समावेश करण्यात आला होता.
ही बनावट कागदपत्रे माहित असूनही संशयित आरोपींकडून जेएम पोर्टलवर सादर करण्यात आली. निविदा पडताळणी समितीतील संबंधित अधिकाऱ्यांनी या कागदपत्रांची पडताळणी न करता निविदा मंजूर होण्यासाठी मदत केली. कामाची मान्यता मिळण्यापूर्वीच निविदा प्रसिद्ध करण्यात आली आणि काम पूर्ण न होता देयक तयार करण्यात आली. तसेच कोणतेही तांत्रिक मूल्यमापन किंवा पूर्णत्व प्रमाणपत्र न घेता, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. राहुल हडपे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी 50 टक्के रक्कम देण्याची शिफारस केली. परिणामी, कंपनीला 3.37 कोटी रुपये अदा करण्यात आले. ही रक्कम आरोपींनी अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप दाखल करण्यात आला आहे.