जळगाव: दिंडोरी–जोपूळ–पिंपळगाव रस्त्याच्या कामासाठी भू-संपादन न करता काम सुरू केल्याच्या विरोधात व शेतकऱ्यांना नियमानुसार मोबदला मिळावा, या मागणीसाठी शेतकरी कृती समितीच्यवतीने धरणे आंदोलन सुरू आहे. धरणे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही व्यापक राजकीय पाठिंबा मिळाला. खासदार भास्कर भगरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला.
खासदार भास्कर भगरे व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलक शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. सदर रस्त्यासाठी अद्याप भू-संपादन झालेले नसतानाही काम सुरू असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. भू-संपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार योग्य मोबदला मिळावा, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करू, असे आश्वासन खासदार भगरे यांनी दिले. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, उपसभापती योगेश बर्डे तसेच ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे यांनीही आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांना पाठिंबा दर्शविला. त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी ठोस भूमिका घेण्याची मागणी केली. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे तालुकाध्यक्ष पांडुरंग गणोरे व सामाजिक कार्यकर्ते विनोद नाठे यांनीही आंदोलनास भेट देऊन शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. भू-संपादन व मोबदल्याबाबत तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकरी कृती समितीने व्यक्त केला आहे.