आमदार देवयांनी फरांदे यांचा माजी आमदार वसंत गितेंवर पलटवार File Photo
नाशिक

Nashik News | दारू, जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांनी माझ्यावर आरोप करू नये

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : दारूचे आणि जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांनी माझ्यावर काय आरोप करावे. चांगल्या व्यक्तीने आरोप केले असते, तर मी त्याची दखल घेतली असती. मी अगोदरच स्पष्ट केले की, त्या कारवाईशी माझा तीळमात्र संबंध नाही. मी सूडबुद्धीने काम करत नाही. अशातही जर ते माझे नाव घेत असतील, तर इथून पुढे मला त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागेल, अशा शब्दांत आमदार देवयानी फरांदे यांनी माजी आमदार वसंत गिते यांच्यावर पलटवार केला.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत गिते यांचे मुंबई नाका परिसरातील जनसंपर्क कार्यालय महापालिकेने जमीनदोस्त केले. या कारवाईनंतर गिते यांनी आमदार फरांदे यांच्यावर गंभीर आरोप करताना, महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ही कारवाई केली जात असल्याचे म्हटले होते. तसेच आयुक्तांनीही याबाबत स्पष्ट संकेत दिल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर फरांदे यांनी रविवारी (दि. ३०) पत्रकार परिषद घेत गिते यांच्यावर जोरदार पलटवार केला. फरांदे म्हणाल्या, ते म्हणतात की, गेल्या ४० वर्षांपासून हे ऑफिस होते. ती नाशिक महापालिकेच्या डीपी रोडची जागा आहे. मात्र, या डीपी रोडवर गेल्या ४० वर्षांपासून अतिक्रमण होते. ही अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविताना महापालिकेला खूप त्रास झाला. महापालिकेने अतिक्रमण काढले त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. नागरिक मला फोन करून आनंद झाल्याचे सांगत असल्याचेही फरांंदे म्हणाल्या. त्या ठिकाणी जुगाराचा अड्डा चालत होता, तोदेखील उद्ध्वस्त करण्यात आला. त्यामध्ये पोलिस कर्मचारीदेखील असून, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आल्याची धक्कादायक माहिती फरांदे यांनी सांगितली. तसेच महापौर, उपमहापौर, आमदार अशी पदे भूषविलेल्या व्यक्तीने महापालिकेच्या डीपी रोडवर 40 वर्षे अतिक्रमण करणे अतिशय गंभीर असल्याचेही फरांदे म्हणाल्या.

दरम्यान, शनिवारी (दि. २९) मुंबई नाका येथील वसंत गिते यांच्या संपर्क कार्यालयावर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर गिते यांनी, नाशिक मध्यच्या आमदारांच्या सांगण्यावरून कारवाई केली गेली. महिला आमदार मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात बसून आयुक्तांवर दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप केला होता.

व्याजासह भाडे घ्या

मी महापालिका आयुक्तांना विनंती करेन की, मोहीम राबवताना झालेला खर्च त्यांच्याकडून वसूल करावा. ४० वर्षे त्यांनी महापालिकेची जागा वापरल्यामुळे त्यांच्याकडून व्याजासह भाडे घ्यावे. लोकशाहीच्या दृष्टिकोनातून हा मोठा कलंक आहे. अतिक्रमण मी काढले नाही. मला अतिक्रमण काढायचे असते, तर मी 10 वर्षांपूर्वीच काढले असते. त्या भागातील अनेक लोकांच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. महापालिकेने गुंडशाहीला घाबरून आतापर्यंत कारवाई केली नसल्याचेही आमदार फरांदे म्हणाल्या.

मला कायम त्रास दिला जातोय

आपण आमदार, महापौर झाले. मुलगा उपमहापौर झाला. याठिकाणी ऑफिस टाकू शकतो. कोणी काही करू शकत नाही, असे आव्हान त्यांनी महापालिकेला दिले होते. ते माझ्या पाठीमागे मला कायम त्रास देण्याचे काम करत असतात. महिला रुग्णालय मंजूर करून आणले, त्यालादेखील त्यांनी विरोध केला. या कारवाईवेळी मी अधिवेशनात व्यग्र होते. सुटीच्या दिवशी अतिक्रमण निर्मूलन मोहीम जरी झाली असली, तरी नागरिकांनी त्याचे स्वागत केले. मी आरोप करत नाही. पाच - सहा वर्षांपूर्वी त्या ठिकाणी जुगाराचा अड्डा होता, तो उद्ध्वस्त केल्याचेही आमदार फरांदे यांनी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT