नाशिक

Nashik News : दमबाजी, हाणामारी अन् मिटवामिटवी; मनसे-ठाकरे गटात असाही राडा

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; मल्टिलेव्हल मार्केटिंग व्यवसायातील आर्थिक देवाणघेवाणीवरून मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचा प्रकार पाथर्डी फाटा येथील नरहरीनगर भागात घडला. यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झालीच, शिवाय कार्यालयाची तोडफोड केली गेली. पुढे प्रकरण इंदिरानगर पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. विनयभंगासह लुटमारीची फिर्यादही दाखल केली जाणार होती. मात्र, दोन्ही गटाच्या नेत्यांनी सामाेपचाराची भूमिका घेत, प्रकरण मिटवले.

मंगळवारी (दि.१७) दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. मनसेचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष अॅड. निकितेश धाकराव आणि असोर्ट कंपनीची फ्रंचाईसी असलेले ठाकरे गटाचे कार्यकर्ते आनंद आहेर यांच्यात कंपनीमधील कर्मचारी युवतीच्या आर्थिक गुंतवणुकीवरून वाद झाला. यावेळी संबंधित युवती तेथे होती. बोलाबोलीचे रुपांतर दमबाजी आणि हाणामारीत झाले. त्यातच मनसे आणि ठाकरे गटात वाद झाल्याची चर्चा सर्वदूर पोचल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी, उपमहानगरप्रमुख नीलेश साळुंखे, संजय गायकर, ऋषिकेश वर्मा, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाट, मदन डेमसे, धनंजय गवळी, त्र्यंबक कोंबडे, शारदा दोंदे, सुभाष गायधनी, नाना पाटील, श्रृती नाईक आदी तेथे पोचले. मनसे नेते माजी महापौर अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, पराग शिंत्रे, नितीन माळी, महिला अध्यक्ष अक्षरा घोडके, स्वागता उपासनी हे देखील घटनास्थळी आले. काही काळ नेमका प्रकार काय आहे, हे कुणालाही न कळल्याने मोठा गोंधळ झाला.

अखेर सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार यांनी दोन्ही गटाच्या नेत्यांची समजूत काढली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार गैरसमजातून झाल्याचा निष्कर्ष काढत नेत्यांनी अॅड. धाकराव, संबंधित युवती आणि आनंद आहेर यांची समजूत काढत प्रकरण मिटवले. सायंकाळी उशिरापर्यंत दोन्ही पक्षांचे समर्थक घटनास्थळी उपस्थित असल्याने, परिसरात तणावाचे वातावरण होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT