नाशिक : त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमी (पीटीसी) समोरील वादग्रस्त जागेच्या फाईल गहाळप्रकरणी तहसिलदार नाशिक यांच्याविरोधात शिस्तभंगाची तसेच फौजदारी कारवाई करण्याचे आदेश राज्य माहिती आयुक्त भूपेंद्र गुरव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
त्र्यंबकरोडवरील पीटीसी समोरील सर्व्हे क्रमांक ७५०, ७५१, ७५५ फायनल प्लॉट क्रमांक ५४१ मधील ६२ एकर या इनामी जमिनीच्या मालकी हक्काचा वाद गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या जमिनी नागरी जमिन कमाल धारणा कायद्यानुसार शासनाला अर्थात महापालिकेला मिळणे अपेक्षित होते. या इनामी जमिनींची मालकी खतिब कुटुंबियांकडे होती. सदर जमिनींमध्ये दिगंबर अहिरवार हे १९५० पासून कुळ म्हणून आहे. सदर जागा इस्टेट को.आॉप हौसिंग सोसायटी व इतर कंपन्यांनी ताब्यात घेतल्या. त्यामुळे अहिरवार यांनी नाशिक तहसिलदारांकडे टेनन्सी केस दाखल केली होती.
अहिरवार यांनी नाशिक तहसिलदारांकडे सदर प्रकरणाशी संबंधित संचिका तसेच कब्जा पावती मिळण्याची विनंती केली होती. परंतू सदर संचिका सापडत नसल्याची माहिती तहसिलदारांकडून मिळाल्याने अहिरवार यांनी माहिती आयुक्तांच्या नाशिक खंडपीठाकडे अपील दाखल केले होते. त्यात आदेश देऊनही नाशिक तहसिलदारांकडून कागदपत्रे उपलब्ध करून दिली न गेल्याने खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त करत तहसिलदारांविरोधात शिस्तभंगाची तसेच फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तक्रारकर्त्यांच्या वतीने ॲड. वसिम सय्यद यांनी काम पाहिले.