देवळा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ जी वरील देवळा-नाशिक रस्त्यावरील गोदावरी हॉटेलजवळ रविवारी दि 24 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर मालेगांव येथे कत्तलीसाठी निर्दयपणे गाईंची वाहतूक सुरु होती. (वाहन क्रमांक एम एच 15 / एच एच 6576) या संशयास्पद वाहनाचा गोरक्षक ज्ञानेश्वर एकनाथ महाजन उर्फ दादा माऊली, योगेश आहेर, पवन निकम, विकास मोहिते व सचिन गुंजाळ यांनी पाठलाग केला. यावेळी चालकाने वाहन भरधाव वेगाने पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या कांदा चाळीला धडक देत वाहन पलटी झाले.
या अपघातानंतर पिकअप वाहनामध्ये डाळिंब व पाण्याच्या बाटल्यांच्या खोक्यांच्या आड गाईंना लपवून कत्तलीसाठी नेले जात असल्याचे उघड झाले. वाहनात अत्यंत अमानुष पद्धतीने गाई कोंबण्यात आल्याचे निदर्शनास आले. या दुर्घटनेत चार गाईंचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळी मृत गाईंवर जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदून अंत्यसंस्कार करण्यात आले. तर उर्वरित जिवंत गाईंना सुरक्षित ठिकाणी व गोशाळेत पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, पोलीस उपनिरीक्षक कैलास गुजर, विनय देवरे, पोलीस हवालदार नितीन बारहाते, एस. व्ही. खुरासने, संदीप चौधरी, सुरेश कोरडे, संजय मोरे आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.