नाशिक : बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानातील राज ठाकरेंची कोनशिला हटविल्याने शहर अभियंता संजय अग्रवाल यांना जाब विचारताना मनसेचे पदाधिकारी. Pudhari Photo
नाशिक

Nashik News | राज ठाकरेंच्या नावाची कोनशिला हटविल्याने वाद

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : गंगापूर रोडवरील जुन्या पंपिंग स्टेशनच्या जागेत सात वर्षांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे शस्त्रसंग्रहालयाच्या जागेत शिवसेनेच्या शिंदे गटाने स्मृती उद्यान उभारल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. स्मृती उद्यानाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करताना राज ठाकरे यांच्या नावाची कोनशिला हटविल्याने संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. ३०) महापालिकेच्या शहर अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत घेराव घातला. कोनशिला पूर्वस्थितीत न झाल्यास खळ्ळखट्याक‌्चा इशारा मनसेने दिला आहे. दरम्यान, कोनशिला पूर्ववत करून देण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी दिले आहे.'

मनसेच्या सत्ताकाळात राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सहकार्याने जुन्या पंपिंग स्टेशनच्या जागेत शस्त्रसंग्रहालयाची उभारणी करण्यात आली होती. अशोक मुर्तडक यांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीत संग्रहालयाचे काम पूर्ण होऊन ३ जानेवारी २०१७ ला राज ठाकरे यांच्या हस्ते व बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या शस्त्रसंग्रहालयाचे उद‌्घाटन करण्यात आले होते. संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर तसेच आतमध्ये उद्घाटन सोहळ्याची कोनशिला बसविण्यात आली होती. या जागेत उभारण्यात आलेल्या स्मृती उद्यानाच्या कामाच्या वेळी शस्त्रसंग्रहालय व उद्घाटन सोहळ्याची कोनशिला काढून टाकण्यात आली. कोनशिला पूर्ववत करण्याचे सांगितल्यानंतर संबंधित ठेकेदार व महापालिका कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी (दि.२८) उद्यानाचे लोकार्पण झाल्यानंतरही कोनशिला पूर्वस्थितीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर संतप्त झालेल्या मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनाला धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरे, बंटी कोरडे, रोहन देशपांडे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहर अभियंता अग्रवाल यांना घेराव घातला. येत्या सात दिवसांत कोनशिला पूर्ववत न बसविल्यास खळ‌्ळखट्ट्याक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला. यानंतर अतिरिक्त आयुक्त चौधरी यांचीही मनसेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी कोनशिला पूर्ववत करून देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

प्रकल्प पूर्ववत करून देण्याची मागणी

मनसेच्या सत्ताकाळात शस्त्रसंग्रहालय, बॉटनिकल गार्डन, लेझर शो, ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क, अहिल्यादेवी होळकर पुलाखाली इंद्रधनुष्यी धबधबा, गोदापार्क, खतप्रकल्प नूतनीकरण, मुंबई नाका वाहतूक बेटाचे सुशोभीकरण, जलशुध्दीकरण प्रकल्प, मुकणे धरण जलवाहिनी आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची उभारणी करण्यात आली होती. सद्यस्थितीत यापैकी बहुतांश प्रकल्पांची दुरवस्था झाली आहे. सदर प्रकल्प पूर्ववत करून देण्याची मागणी देखील मनसेकडून यावेळी करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT