नाशिक : निल कुलकर्णी
अस्थिरता, अनिश्चितता, जीवघेणी स्पर्धा आणि स्वत:ला सिद्ध करण्यासाठी लागणारी कसोटी यामुळे कोविड काळानंतर संगीतातून रोगोपचार घेणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, असे निष्कर्ष संगीतोपचार अभ्यासकांनी नोंदवले.
अनेक शास्त्रीय शुद्ध राग आणि वाद्यसंगीताच्या धून या मेंदू, मनासाठी अभ्यंगस्नान ठरत असल्याने असे उपचार घेणाऱ्याची संख्या पाच पटीने वाढली आहे, अशी माहिती अभ्यासकांनी दिली.
गायक तानसेन मल्हार राग गात असे तेव्हा आकाशात मेघ दाटून येत पाऊस पडत असे. 'दीप' रागाने दीप प्रज्वलत होत असत असे म्हटले जात. यातील अतीशयोक्तीचा भाग जरी सोडला तरी शास्त्रीय संगीतातील राग हे अनेक उपचारांमध्ये साहायक पूरक थेरपी म्हणून उपयुक्त ठरत आहेत. जागतिक संगीतोपचार दिन बुधवारी(दि.२६) जगभर साजरा झाला. त्यानिमित्ताने भारतीय संगीतातील रागदारी 'थेरपी' संयुक्त उपचार पद्धतीत अधोरेखित केली गेली.
नाशिकमध्ये गेली अनेक वर्ष डॉ. विजय कुलकर्णी हे रुग्णांवर संगीतातून रोगोपचार करत आहेत. यासह एमएमआरके महिला महाविद्यालातील प्राध्यापक आणि संगीतोपचार तज्ज्ञ यांनीही अनेक रुग्णांचे मानसिक तसेच शारीरिक व्याधींसाठी साहायक थेरपी म्हणून संगीतोपचार केले आहे. मुंबईतील शशांक कट्टी हेही रुग्णांवर अशा प्रकारे उपचार करुन संयुक्त उपचार पद्धतीतून नवीन प्रयोग करत आहेत. कोविड काळानंतर पूरक उपचार पद्धती, संयुक्त उपचार पद्धतीत संगीत प्रभावी उपाय म्हणून समोर आले आहे.
संगीतातून रोगोपचार हा मेंदू- मनाचे अभ्यंग स्नान ठरतोय. वाद्य वादनाचे संगीत अधिक प्रभावी ठरतात. रुग्ण ज्यावेळी शास्त्रीय राग, त्यावर वाद्यसंगीत एेकतो तेव्हा विशिष्ट प्रसंगाची आठवण होऊन तो स्वत:ला त्यासाठी 'रिलेट' करतो. त्यामुळे मेंदू त्यात एकाग्र होतो. शास्त्रीय वाद्यसंगीतही मानसिक आजारावर प्रभावी ठरते.प्रा. रुपाली काळे, संगीतोपचार तज्ज्ञ, नाशिक.
राग भैरव - रक्तदाब यापासून आराम मिळतो
शिवरंजनी - स्मरणशक्ती समस्या
भैरवी - सायनस, सर्दी, कफ, दातदुखी यावर आराम देते
चंद्रकंस - हृदयरोग आणि मधुमेहावरील उपचार
दरबारी कानडा - ताण कमी करते आणि आराम देते
बिहाग आणि बहार - निद्रानाश, शांत, गोड झोपेसाठी
दरबारी - ताण- तणाव,अस्वस्था, बैचेनीवर आरामदायी.