नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | येथील जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र समोर आले आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डात दाखल करण्यात रुग्णांमध्येच जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली असून रुग्णालयातील परिचारिका संघटना आक्रमक झाली आहे. त्यांनी सुरक्षा धोक्यात येत असल्याने सरळ काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.
नाशिक जिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याचे गेल्या महिन्यातच समोर आले होते. रुग्णालयातून एका बाळाची अदलाबदल झाल्याच्या घटनेनंतर बाळ चोरीला गेल्याची घटना देखील घडली होती. यानंतर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीच्या आईने परिसरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे वृत्त देखील समोर आले होते. त्यानंतर थेट आता आयसीयू वॉर्डातच दाखल करण्यात आलेल्या रुग्णांमध्येच तुफान मारामारी झाल्याची घटना घडली आहे.
नाशिकमध्ये दोन दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये वाद होऊन त्यांच्यात हाणामारी झाली होती. यात काही जण जखमी झाले होते. हाणामारीत जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान या जखमींमध्ये पुन्हा जिल्हा रुग्णालयातील इमर्जन्सी वॉर्डमध्ये हाणामारी झाली आहे. यामध्ये रुग्णालयातील खुर्च्या व स्टूल एकमेकांना मारून फेकण्यात येत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येत आहे. त्यामुळे रुग्णालयात गोंधळ उडाल्याने इतर रुग्णांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जखमी रुग्णांमध्ये हाणामारी सुरू असताना येथील डॉक्टर, महिला कर्मचारी व परिचारिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या प्रकरणामुळे पुन्हा एकदा समोर आला आहे. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संघटना आक्रमक झाल्या असून जिल्हा रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर बुधवार (दि.26) रोजी काळ्या फित लावून निषेध नोंदविण्यात आला आहे. रुग्णालयात सुरक्षा रक्षक आणि पोलीस तैनात केले नाही, तर काम बंद करण्याचा इशारा परिचारीकांनी दिला आहे.