निमा इंडेक्स file
नाशिक

Nashik News | सं'घटना' बदल; सदस्यांमध्ये चलबिचल!

महाराष्ट्र चेंबर, निमा, सराफ असोसिएशनमध्ये घटनेचा तिढा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सतीश डोंगरे

ट्रस्ट किंवा संस्थेचा कारभार लोकशाही पद्धतीने चालावा यासाठी 'घटना' सर्वोच्च असते. घटना संस्थेला आणि तिच्या सभासदांना एकसंध ठेवते. मात्र, त्यातच बदल करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर सदस्यांमध्ये चलबिचल होणे स्वाभाविक आहे. सध्या शहरातील 100 किंवा त्याहून अधिक वर्षांचा वारसा लाभलेल्या संघटनांमध्ये बदलाचे वारे वाहात असल्याने, सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शतकोत्तर महोत्सव साजऱ्या करीत असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चर या संस्थेच्या 'घटना' बदलाची एकच चर्चा सध्या रंगत आहे. संस्थेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढविण्यासाठी घटनेतील मूळ तरतुदीच बदलण्याचा प्रस्ताव कार्यकारिणीच्या सभेत मंजूर करण्यात आल्याचे बाेलले जात असले, तरी अध्यक्ष ललित गांधी यांनी या चर्चा निरर्थक असल्याचे स्पष्ट केले आहे. गांधी हे जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचेही अध्यक्ष आहेत. वास्तविक, मूळ तरतुदीनुसार चेंबरचा सदस्य दोनपेक्षा अधिक वेळा म्हणजे चार वर्षांपेक्षा अधिक काळ अध्यक्ष राहू शकत नाही. मात्र, अशातही विद्यमान अध्यक्षांनी घटनेत बदल केल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी कमी सदस्य संख्या असलेल्या नागपूर येथे कार्यकारिणीची बैठक घेऊन त्याबाबतचा प्रस्ताव मांडल्याची चर्चा सदस्यांमध्ये सुरू आहे. मात्र, चांगल्या कामांवर चर्चा करावी, असे स्पष्ट मत गांधी यांनी नोंदविले आहे.

दुसरीकडे नाशिक इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात 'निमा'तही घटनेचा तिढा आहे. सुवर्णमहोत्सवी वर्ष साजऱ्या करणाऱ्या निमाची १९८३ ची घटना आहे. मात्र, त्यात अनेक त्रुटी असल्याने, ती दुरुस्ती गरजेची आहे. २००४ सालानंतर चेंज रिपोर्ट मंजूर नसल्यामुळे ही घटनाच बेकायदेशीर असल्याचाही अनेकदा आरोप झाला आहे. प्रशासक राजवट उठवताना, धर्मादाय उपायुक्तांनी घटना दुरुस्तीचे आदेश दिले होते. यास दोन वर्षांपेक्षा अधिक काळ झाला असून, घटना दुरुस्तीबाबत कुठल्याच हालचाली होत नसल्याने निमाचा कारभार निवडणुकीविनाच हाकला जात आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास, पुढील काळात घटनेवरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

पुराच्या पाण्यात वाहून गेली 'घटना'

स्वातंत्र्यपूर्व कालावधीत स्थापन करण्यात आलेल्या नाशिक सराफ असोसिएशनची घटना चक्क पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने, संस्थेचा कारभार रामभरोसे झाला होता. मात्र, विद्यमान अध्यक्ष गिरीश नवसे यांनी माहिती अधिकारांतर्गत सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव केली आहे. मात्र, सद्यस्थितीत संस्थेकडे घटनेची मूळ प्रत नसून, झेरॉक्स आहे. तर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट पुराच्या पाण्यामुळे अस्पष्ट झाले आहे. पूर्वी संस्थेचे सर्व दस्तावेज पुण्यात ठेवले जात होते. तेथूनही काही दस्तावेज हस्तगत करण्यात आले आहेत.

पुराच्या पाण्यात भिजलेले दस्तावेज हस्तगत करण्यात आम्हाला यश आले आहे. हे दस्तावेज अस्पष्ट झाले असून, त्यावर काम सुरू आहे. संस्थेच्या घटनेची झेराॅक्स प्रत आमच्याकडे आहे. मात्र, घटना जुनी असल्याने, त्यात बदलाची गरज आहे. सर्वसाधारण सभेत घटना दुरुस्तीचा प्रस्ताव मांडणार आहे.
गिरीश नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन, नाशिक.
घटनादुरुस्तीसाठी स्वतंत्र कमिटी नेमली असून, निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे याबाबतचे कामकाज पाहात आहेत. दुरुस्तीबाबतचे आतापर्यंत जे काही काम झाले, त्याच्या पुढचे काम लवकरच मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
आशिष नहार, अध्यक्ष, निमा, नाशिक
शतक महोत्सव माझ्या नेतृत्वाखाली साजरा करावा, अशी राज्यभरातील सदस्यांची इच्छा आहे. मात्र, कार्यकाळ संपणार असल्याने, माझा उत्तराधिकारीच शतक महोत्सव साजरा करेल, हे मी जाहीरपणे स्पष्ट केले आहे. निवडणूक काळात घटनेतील त्रुटीवरून बऱ्याच तक्रारी झाल्या होत्या. त्या दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव होता. हा संस्थेच्या नियमित प्रक्रियेचा भाग आहे.
ललित गांधी, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT