नाशिक : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजी नगर येथील प्रकल्प कार्यालयात सीसीटीव्ही वॉर रुमचे उद्घाटन अमरावतीचे अप्पर आयुक्त जितेंद्र चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. मिशन 100 डेज या उपक्रमांतर्गत हा वॉर रुम बनविण्यात आल्याची माहिती प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी दिली.
मोरे यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील 5 शासकीय आश्रमाशाळा आणि 14 शासकीय आदिवासी वसतीगृह सीसीटीव्हीद्वारे जोडण्यात यावेत यासाठी प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून नियोजन सुरु होते. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरावा केला. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एकूण 1 कोटी 25 लाखांच्या निधीतून वॉररुमची उभारणी केली असून याअंतर्गत आश्रमशाळा आणि वसतीगृहातील एकूण 321 सीसीटीव्ही वॉररुमशी जोडले आहेत. यामुळे आता शासकीय आश्रमशाळा आणि आदिवासी आश्रमशाळांवर वॉररुमची नजर राहणार आहे. यामुळे आश्रमशाळा आणि वसतीगृहातील स्वच्छता, मुलामुलींचे प्रश्न, शिक्षकांचे कामकाज, मुलामुलींची व्यवस्था, अभ्यास, खेळाचे निरीक्षण करता येणार आहे. वॉररुम नसल्यामुळे संपर्कव्यवस्था कमी असल्यामुळे व्यवस्थाप्रणाली कमकुवत होती मात्र, आता सीसीटीव्ही वॉररुममुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न तत्काळ सुटण्यास मदत होणार आहे.
आश्रमशाळा आणि वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे संगोपन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या उपक्रमाचे अप्पर आयुक्तांकडून कौतुक झाले आहे. पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगरमधील 8 आश्रमशाळा आणि 14 आदिवासी वसतीगृहे सीसीटीव्ही वॉररुमसोबत जोडण्यात आली आहेत. दुसर्या टप्प्यात बीड आणि लातुर येथील आश्रमशाळा आणि वसतीगृहे जोडण्यासाठी प्रकल्प कार्यालय प्रयत्न करीत आहे.चेतना मोरे, प्रकल्प अधिकारी, औरंगाबाद