नाशिक : बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत यासाठी शुक्रवारी (दि. 16) सकल हिदू समाज नाशिक जिल्हातर्फे नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने हिसक वळण घेतले आहे. सरकारविरोधी असणारे हे आंदोलन आता हिंदूंच्या विरोधात सुरू झाले आहे. बांगलादेशात 27 ठिकाणी हिंदुंना लक्ष करण्यात आले. या गोष्टीमुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात नाशिक जिल्हा येथील सर्व हिंदू संघटना, राजकीय पक्ष आणि हिंदू नागरिक यांनी एकजुटीने सकल हिंदू समाज नाशिक जिल्हाच्या वतीने, शुक्रवारी (दि.16) संपूर्ण नाशिक बंदची हाक दिली आहे. या बंदला नाशिकमधील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सनातन, हिंदू जनजागृती समिती, समविचारी राजकीय पक्ष, मनसे, भाजप, हिंदू एकता आंदोलन पक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे व उबाठा) तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटना यांनी पाठींबा जाहीर केला आहे. सर्व नाशिककरांनी या बंदमध्ये सामील होऊन बांगलादेशी हिंदु बांधवांना पाठिंबा द्यावा असे आवाहन सकल हिंदु समाजामार्फत करण्यात आले आहे.
नाशिक शहराच्या परिसरात ठिकठिकाणी साधारणतः दुपारी 12 ते 2 या वेळेत उभे राहून हातात फलक घेवून निदर्शने केली जाणार आहेत. त्यानंतर दुचाकी रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.