Fraud Case file photo
नाशिक

आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; CA कडून ८.७६ कोटींची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी विशेष अवतारपूजा करावी लागेल, असा बनाव करून भोंदू अशोक खरातने आपल्या सीए ललित पोकळे यांच्याकडून तब्बल ८ कोटी ७६ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी उशिरा खरातविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी ललित पोकळे हे एकेकाळी खरातचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते. त्यांनी विशेष तपास पथकाकडे लेखी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून गुन्हा नोंदवला. तपासात पोकळे यांच्या घरावर यापूर्वी ईडीकडून छापाही टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

दरम्यान, १८ मार्च रोजी एका महिलेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात खरातला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याविरोधात विविध गुन्हे उघडकीस येऊ लागले आहेत. महिला लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि इतर गंभीर आरोपांशी संबंधित अनेक गुन्हे नाशिक, पुणे, ठाणे व अहिल्यानगर या ठिकाणी दाखल झाले आहेत.

या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन शासनाने महिला आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची विशेष तपास पथकाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेगाने सुरू असून, १८ मार्चपासून अशोक खरात पोलीस कोठडीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT