नाशिक : महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयतर्फे गिरणारे येथे गंगापूर धरण्याच्या बॅकवॉटरजवळ सुरु असलेल्या 'इको ग्लॅम्पिंग फेस्ट'ला 19 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परीक्षा कालावधी आणि अन्य काही कारणांमुळे पर्यटकांचा प्रतिसाद कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
पर्यटनाला चालना मिळावी म्हणून महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालतर्फे पर्यावरणला जराही धक्का न लावता निर्सगसान्निध्यात पर्यटकांना आरामदायी अनुभव देणाऱ्या 'इको ग्लॉमिंग फेस्टीव्हल' 17 जानेवारीपासून सुरुवात झाली. गिरणारे येथे गंगापूर धरण्याच्या बॅकवॉटरजवळ शांत, रम्य ठिकाणी आरामदायी तंबू, जलाशयाचे सौंदर्य दिसेल, अशा स्थळांवरील पारदर्शक तंबूतील आलिशान निवारा, वाईनरीस अन् खानपाणाच्या विलासी पर्याय आणि विविध माध्यमे, जाहिराती, होर्डींगव्दारे मार्केटिंग व ब्रॅडिंगही उत्तम केली गेली. यामुळे प्रारंभी महोत्सवाला उत्तम प्रतिसाद लाभला. राज्यातील हा पहिलाच, पथदर्शी प्रकल्प ठरला. अभिनव संकल्पनेमुळे त्याला पर्यटकांचा पहिल्या टप्प्यात उत्तम प्रतिसाद मिळाला.
फेब्रुवारी मार्चमध्ये दहावी बारावीच्या परीक्षा आणि आता पदवी आणि अन्य परीक्षांमुळे 'फेस्ट' मध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली. त्यामुळे मुदतवाढ देण्याचा निर्णय पर्यटन संचालनलयातर्फे घेण्यात आला. साहसी खेळ, आलिशान, आरामदायी तंबूतील निवारा अन् जिभेला तृप्त करणारे असंख्य खाद्यप्रकार यामुळे पर्यटकांची संख्या मुदतवाढीनंतर उन्हाळ्यात नक्कीच वाढेल, असा आशावाद नाशिक कार्यालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड यांनी व्यक्त केला.
उन्हाळ्याचा कालावधी लग्नसराईचा असतो. त्यामुळे प्री वेडिंग, पोस्ट वेडींग फोटोशूट सह जोडपे या ठिकाणाला पंसती देत आहेत. विशेष म्हणजे कॉपोरेट कंपन्यांच्या परिषदा, मिटींग, कार्यशाळांसाठी समुह बूकिंगलाही उद्योगसमुहांची पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे इको फेस्टच्या 'डेस्टिनेशन वेडिंग' म्हणूनही पसंत मिळत असून एक शाही विवाह सोहळा नुकताच येथे पार पडला.
'ग्लॅम्पिंग फेस्ट' राज्यभरातून उत्तम प्रतिसाद लाभला. आता परीक्षांचा काळ असल्यामुळे पर्यटकांचा ओघ मंदावला. उन्हाळ्याच्या सुट्या पर्यटनाचा हंगाम असतो. १९ एप्रिलपर्यंत फेस्टला मुदतवाढ देण्यात आल्याने अधिकाधिक पर्यटक भेट देतील या दृष्टीने नियोजन आहे.मधुमती सरदेसाई-राठोड , उपसंचालक, नाशिक कार्यालय