बोगस प्रमाणपत्रधारक ग्रामसेवक निकम निलंबित file photo
नाशिक

Nashik News | बोगस प्रमाणपत्रधारक ग्रामसेवक निकम निलंबित

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : मेंदूच्या आजाराचे बोगस प्रमाणपत्र सादर करून शासकीय सेवेचा लाभ घेणाऱ्या महिरावणी येथील ग्रामसेवक सुनील निकम याला निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी काढले आहेत. यापूर्वी नांदगाव तालुक्यातील ग्रामसेवकाला अनुदानाच्या रकमेत अपहार केल्याच्या कारणावरून निलंबित केल्यानंतर सात दिवसांत सीईओंनी निलंबनाची दुसरी कारवाई केली आहे.

राज्यात नुकताच बोगस प्रमाणपत्राचा आधार घेऊन नागरी सेवेत दाखल झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर जिल्हा परिषदेतही असा प्रकार उघडकीस आल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू होती. सुनील निकम या ग्रामसेवकाने मेंदूचा आजार असल्याचे बोगस प्रमाणपत्र देत शासकीय सेवेत लाभ लाटल्याचे समाेर आल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेत बोगस प्रमाणपत्र सादर करून शासकीय सेवेत लाभ लाटणाऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे.

दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी येथील तक्रारदाराने फेब्रुवारीमध्ये नाशिक विभागीय आयुक्तांकडे तत्कालीन पिंपळणारे येथील ग्रामसेवक सुनील निकम यांच्याविरोधात बोगस प्रमाणपत्र देत शासनाची फसवणूक केल्याने त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत निवेदन दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. यासंदर्भात सीईओ मित्तल यांनी त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालामध्ये निकम यांनी कागदोपत्री मेंदूचा आजार आणि मिरगी येणे असे नमूद केले आहे. मात्र, त्याबाबतचा सिटी स्कॅन रिपोर्ट सादर केलेला नाही. तसेच त्यांनी कोणत्याही मेंदूविकार तज्ज्ञांचा सल्लादेखील घेतला नसल्याचे समोर आले असून, सद्यस्थितीत त्यांनी नमूद केलेल्या आजारांची कोणतीही लक्षणे व न्यूरो डेफोसीट आढळले नसल्याने त्यांचा आजार दिसून येत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, सीईओ मित्तल यांनी काढलेल्या आदेशामध्ये निकम यांनी मेंदूच्या आजाराबाबत कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता प्रमाणपत्र मिळवून लाभ घेतला आहे. यामध्ये त्यांनी शासनाची फसवणूक केली आहे, हे निदर्शनास येत असून, त्यांचे शासकीय सेवेतून निलंबन करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

...हे तर हिमनगाचे टोक

आजारपण, दिव्यांग यांचे बोगस प्रमाणपत्र वापरून शासकीय नोकरी लाटणारे तसेच आहे त्या नोकरीमध्ये लाभ मिळविणारे अनेक कर्मचारी आहेत. त्यामुळे योग्य आणि पात्र कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे या कारवाईचे स्वागत होत असतानाच हे तर हिमनगाचे टोक आहे, खरे मोठे मासे अद्याप बाहेरच असल्याच्या प्रतिक्रिया जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहेत.

आत्मदहन इशाऱ्यानंतर विभागीय आयुक्तांच्या सूचनांची चर्चा

बोगस प्रमाणपत्रधारक ग्रामसेवकाविरोधात तक्रार करणाऱ्या तक्रारदाराने शासनाकडून कारवाईला टाळाटाळ करण्यात येत असल्याने विभागीय आयुक्त कार्यालयात आत्मदहनाचा इशारा दिला होता. याचे गांभीर्य लक्षात घेत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जिल्हा परिषदेला सूचना प्राप्त झाल्या असल्याच्या चर्चा जिल्हा परिषद कार्यालयात सुरू आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT