महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील file photo
नाशिक

Nashik News | महसुलमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या भाजपची बैठक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : भाजपने विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली असून, नाशिक जिल्ह्यासाठी संघटनात्मक प्रभारी म्हणून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची नियुक्ती केली आहे. शनिवारी (दि.२७) त्यांच्या उपस्थितीत १५ विधानसभा मतदारसंघांची आढावा बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीनंतर जिल्ह्यात भाजप किती जागा लढविणार तसेच महायुतीतील घटक पक्षांना किती जागा सोडायच्या याबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर केला जाणार आहे. (Revenue Minister Radhakrishna Vikhe-Pati)

लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही. किंबहुना जिल्ह्यातील नाशिक, दिंडोरी आणि धुळे या तिन्ही मतदारसंघात भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी भाजपने आतापासूनच सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यात मंथन झाल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभारींकडून जिल्हानिहाय संघटनात्मक प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रभारींवर जिल्ह्यातील विधानसभानिहाय मतदारसंघांचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नाशिकसाठी संघटनात्मक प्रभारी म्हणून विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपकडून नाशिक शहर, नाशिक उत्तर जिल्हा, नाशिक दक्षिण जिल्हा आणि मालेगाव जिल्हा असे चार विभाग पाडण्यात आले आहेत. त्यानुसार या चारही विभागातील जिल्हाध्यक्ष, आमदार, सरचिटणीस, चिटणीस, कार्यकारिणी सदस्यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक येत्या शनिवारी (दि.२७) बोलविण्यात आली आहे. या बैठकीत जिल्ह्यातील १५ विधानसभांचा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीस उत्तर महाराष्ट्राचे संघटनमंत्री रवी अनासपुरे, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, आमदार उपस्थित राहणार आहेत.

विधानसभानिहाय विस्तारक नेमणार

विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत विधानसभानिहाय विस्तारकांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. त्यासोबतच संघटनात्मक बळकटीकरणासाठी जिल्हाध्यक्ष तसेच युवा कार्यकर्त्यांकडेही विशेष जबाबदारी सोपविली जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या लोकहिताच्या योजना घरोघरी पोहोचविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

भाजपला हव्यात जास्त जागा

नाशिक शहरातील नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम व नाशिक मध्य या तीनही मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तसेच जिल्ह्यातील बागलाण, चांदवड-देवळा मतदारसंघातही भाजपचे आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा पदरात पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यादृष्टी मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन त्यासंदर्भातील अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर केला जाणार आहे.

SCROLL FOR NEXT