देवळा : "शरीर सौष्ठव राखण्यासाठी हक्काची व्यायामशाळा द्या," ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी पडून आहे. वारंवार निवेदने देऊनही पदरी निराशाच आल्याने, अखेर देवळा तालुक्यातील दहिवड येथील सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामविकास समितीचे अध्यक्ष संजय दहिवडकर यांनी मंगळवारी (दि. २०) अभिनव असे 'भिक मांगो' आंदोलन केले. रस्त्यावर उभा राहुन झोळी पसरून जमा झालेली रक्कम त्यांनी थेट आमदारांच्या संपर्क कार्यालयात जमा करून प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला.
दहिवड हे नाशिक जिल्ह्यातील एक मोठे महसुली गाव म्हणून ओळखले जाते. गावातील शालेय विद्यार्थी आणि तरुणांच्या आरोग्यासाठी अद्ययावत जिम तथा व्यायामशाळा उभारण्याची मागणी संजय दहिवडकर यांनी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याकडे केली होती. यापूर्वी ग्रामसभेत आणि मासिक बैठकीतही याचे ठराव झाले होते. "जर मागणी पूर्ण झाली नाही, तर भिक मांगो आंदोलन करू," असा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने अखेर दहिवडकर यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले.
मंगळवारी सकाळी दहिवड गावापासून या आंदोलनाला सुरुवात झाली. संजय दहिवडकर यांनी हातात झोळी घेऊन धोबीघाट, मेशी फाटा, पिंपळगाव वाखारी, खुंटेवाडी फाटा आणि देवळा तालुक्यातील विविध शासकीय-निमशासकीय कार्यालयांच्या बाहेर उभे राहून भिक्षा मागितली. "सरकार एका व्यायामशाळेची मागणी पूर्ण करू शकत नाही, हा आमचा निषेध आहे," अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
दिवसभर रस्त्यावर आणि कार्यालयांतून भिक्षा मागून जो निधी जमा झाला, तो दहिवडकर यांनी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या देवळा येथील संपर्क कार्यालयात नेऊन दिला. "अठरापगड जाती-धर्माच्या लोकांचे हे गाव असूनही एका साध्या जिमसाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत आहे, हे दुर्दैवी आहे," असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
शासकीय यंत्रणेच्या दिरंगाई विरोधात पुकारलेल्या या अनोख्या आंदोलनाची सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चा रंगली आहे. आता तरी तरुणांच्या या मागणीची दखल घेऊन दहिवड येथे व्यायामशाळा उभी राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.