नाशिक : 'तुम्हाला मुलगा झाला' असा संदेश गर्भवतीच्या नातलगांना देत रुग्णालयाच्या नोंदवहीतही मुलगा झाल्याची नोंद करण्यात आली. मात्र दोन दिवसांनी पालकांना मुलाएेवजी मुलगी सोपवण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा शासकीय रुग्णालयात घडला आहे. नातलगांसह प्रहार संघटनेने बाळ स्वीकारण्यास नकार दिल्याने तणाव निर्माण झाला. याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली.
नांदूरनाका परिसरातील रूतिका महेश पवार या महिलेची रविवारी (दि. १३) रात्री जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाली. प्रसूतीनंतर बाळ पुरूष जातीचे असल्याचे परिचारीकांनी रुतिका यांच्या नातेवाईकांना सांगितले. तसेच प्रसूती कक्षातील रजिस्टरवर तशी नोंदही केली. दरम्यान, बाळाचे वजन कमी असल्याने त्यास एसएनसीयू कक्षात उपचारासाठी दाखल केले. बाळाची तब्येत बिघडल्याने त्यास खासगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला. त्यामुळे मंगळवारी (दि. १५) रात्री नातलगांनी डिस्चार्ज घेण्यास सुरुवात केली.
बाळाचा ताबा घेताना तो मुलगा नव्हे तर मुलगी असल्याचे नातलगांच्या लक्षात आले. त्यामुळे आम्हाला आमचा मुलगा द्या, अशी मागणी नातलगांनी केली. मात्र हे तुमचेच बाळ आहे असे परिचारीकांनी सांगितले. त्यामुळे नातलगांनी रुग्णालयातील नोंदी तपासल्या असत्या त्यावर पवार यांना मुलगा झाल्याची नोंद आढळून आली. त्यामुळे कक्षातील कर्मचारीही गोंधळात पडले. संतप्त नातलगांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरूवात केली. प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. बुधवारी (दि. १६) सकाळी संबंधित घटनेची चौकशी समिती नेमण्यात आली. तसेच 'आम्हाला आमचा मुलगाच परत करा. आम्ही मुलगी ताब्यात घेणार नाही.' या प्रकाराची चौकशी करून दोषींना सेवेतून बडतर्फ करा अशीही मागणी नातलगांनी केली. जोपर्यंत मुलाचा ताबा मिळत नाही तोपर्यंत संबंधित मातेचा डिस्चार्ज घेणार नसल्याचाही पवित्रा नातलगांनी घेतला होता.
मुलगा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर नातलगांनी सर्वांना ही गोड बातमी कळवली. मात्र मुलाएेवजी मुलगी ताब्यात देत असल्याचे समजताच नातलग संतप्त झाले. या घटनेमुळे दिवसभर नातलग उपाशीपोटी रुग्णालयात होते. चौकशी समितीचा अहवालही उशिरा मिळाला. दरम्यान, प्रसूतीपूर्वी संबंधित महिलेची खासगी ठिकाणी सोनोग्राफी केली. त्यावेळी गर्भाला पोटाचा विकार असल्याचे निदान झाले होते. प्रसूती पश्चात स्त्री जातीच्या बाळाची सोनोग्राफी केली असता त्यामध्येही संबंधित बाळाला पोटाचा विकार आढळल्याचे चौकशी समितीच्या अहवालात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.
कागदोपत्री नोंदीमुळे हे प्रकरण गुंतांगुंतीचे झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संबंधित बाळाची डीएनए टेस्ट होत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा उलगडा होणार नसल्याचा निष्कर्ष जिल्हा रुग्णालय प्रशासनाने काढला आहे. त्यामुळे बाळाची डीएनए चाचणी होणार आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाद्वारे ही चाचणी होणार असून, नातलगांना खासगी ठिकाणी चाचणी करायची असल्यास ते करू शकतील असे प्रशासनाने सांगितल्याचे समजते.
बाळाच्या हातावर मुलगा असा टॅग असला तरी ती मुलगी होती असा कर्मचाऱ्यांचा दावा आहे. चौकशी समितीने कागदपत्रे व सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, कर्मचाऱ्यांसह नातलगांचे जबाब घेतले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यावर दोषी आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. प्राथमिक तपासात मुलीऐवजी चुकून मुलगा अशी नोंद झाल्याची शक्यता आहे.डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक
काही दिवसांपूर्वी नवजात बालकास तोंडी मृत घोषीत करीत ते कपड्यात गुंडाळून ठेवले. मात्र काही तासांनी ते बाळ जिवंत आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे या घटनेचीही चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. समिती नेमूणही येथील कामात सुधारणा होत नसल्याने प्रसूती कक्षातील या गलथान कारभारांमुळे संताप व्यक्त केला जात आहे.