नाशिक

Nashik News | एसएमबीटी फार्मसीच्या तेरा पेटंटला मान्यता

अंजली राऊत

नाशिक: पुढारी वृत्तसेवा –  एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसीच्या तब्बल १३ पेटंटला पेटंट कार्यालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील पेटंट प्राप्त करणारे एसएमबीटीचे कॉलेज ऑफ फार्मसी हे एकमेव महाविद्यालय ठरले आहे.

आर्सेनिक आणि कॅडमियम मानवी आरोग्यासाठी कमी प्रमाणात हानिकारक असू शकतात. याबाबत अभ्यासपूर्ण परीक्षण करून एक पेटंट डिझाईन साकारण्यात आले. या डिझाईनला देखील पेटंट मिळाले आहे. यासोबतच आरोग्याचे संरक्षण व स्वयंचलित औषधाचे डोस लागू करणाऱ्या उपक्रमाच्या डिझाईनला पेटंट मान्यता मि‌ळाली आहे. तसेच डिजिटल आणि पोर्टेबल वेदनाशामक उपकरण तयार करण्यात आले असून त्यात हॉट प्लेट अनाल्जेसिओमीटर वापरले जाते. यालादेखील पेटंट मान्यता मिळाली.

खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षा चाचणी करण्यासाठी इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी उपकरणाला पेटंट प्राप्त झाले आहे. दुसरीकडे नायसोम्स नावाचे एक डिव्हाईससाठी पेटंट तयार करण्यात आले असून विविध आजारांवरील उपचारासाठी एक महत्वपूर्ण औषधी तंत्रज्ञान आहे. स्मार्ट आणि पोर्टेबल टेलफ्लिक वेदनाशामक उपकरणाचे पेटंट मानवी शरीरात वेदना व संवेदनशीलता मोजण्यासाठी वापरले जाते. यासही मान्यता मिळाल्यामुळे अनेक रुग्णांच्या वेदना कमी करण्यास भविष्यात मदत होईल सांगितले जात आहे.

मिश्रानांच्या विलगीकरणासाठी वापरण्यात येणारे तिहेरी उर्ध्वपातन यंत्र विकसित करण्यात आले आहे. हे संशोधन औषध, खाद्य उत्पादन आणि अन्य वैज्ञानिक अभ्यासासाठी वापरले जाऊ शकते. ननोकाम्पोझीट विश्लेषण उपकरण फार्मास्युटिकल उत्पादनांमध्ये विविध धातूचा शोध घेण्यासाठी मदत होते. मानवी जीवनावर विषबाधा किवा आरोग्यावर प्रतिकुल परिणाम टाळण्यासाठी या उपकरणाची मदत होते. पेटंट कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यानंतर व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. हर्षल तांबे, अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगावकर यांनी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. योगेश उशीर यांच्यासह संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. आणखी आठ पेटंट रजिस्टर झालेले असून लवकरच या पेटंटला मान्यता मिळेल, अशी आशा असल्याचे प्राचार्य डॉ. उशीर यांनी व्यक्त केली आहे.

SCROLL FOR NEXT