या प्रकरणी महाराष्ट्र राज्य आशा -गट प्रवर्तक कर्मचारी कृती समिती आणि आयटक यांच्या वतीने निफाड पोलिस ठाण्याला निवेदन देण्यात आले.  Pudhari News Network
नाशिक

Nashik News : निफाडमध्ये आशा वर्करवर रुग्णवाहिका चालकाने केला लैंगिक छळ

आशा, गट प्रवर्तक सेविकांच्या सुरक्षेसाठी ठोस धोरणाची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : निफाड तालुक्यातील एका आशा वर्करवर १०२ रुग्णवाहिका चालकाकडून झालेल्या लैंगिक छळप्रकरणी तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेविरोधात महाराष्ट्र राज्य आशा -गट प्रवर्तक कर्मचारी कृती समिती आणि आयटक यांच्या वतीने निफाड पोलिस ठाण्याला निवेदन देण्यात आले. दरम्यान, संशयित भाऊसाहेब गुढगे हा राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी वाहनचालक पदावर रोजंदारीने काम करत असल्याने त्यास प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव (वाकडा) चे वैद्यकीय अधिकारी यांनी गैरवर्तणूक प्रकरणामुळे तात्काळ कार्यमुक्त केले आहे. याबाबतचा अहवाल त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठविला आहे.

घडलेल्या घटनेनुसार पीडित आशा वर्करने गर्भवती महिलेस प्रसूतीसाठी देवगाव व नंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर परतीच्या प्रवासात संशयित चालक भाऊसाहेब गुढघे (रा. निमगाव वाकडा) याने शिवरे फाट्याजवळ रुग्णवाहिका थांबवून पीडित आशा वर्करशी अश्लील वर्तन करत विनयभंग केला. यावेळी त्यांनी तत्काळ विरोध करत रुग्णवाहिकेतून उतरून नातेवाइकांना संपर्क साधला. सध्या त्या उपचार घेत आहेत तर, या घटनेचा निषेध करत राज्य अध्यक्ष राजू देसले यांनी ही केवळ एका महिलेवरील नाही तर संपूर्ण आशा वर्गाच्या सन्मानावर झालेली लज्जास्पद घटना असल्याचे म्हटले आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबत मागणीचे निवेदन दिले.

यावेळी जिल्हाध्यक्षा सुरेखा खैरनार, प्राजक्ता कापडणे, तल्हा शेख, मनीषा खैरनार, रोहिणी मुदगल, रुपाली सानप, वैशाली कवडे, छाया जगताप, माधुरी बर्वे, वर्षा गांगुर्डे, प्रीती भाबड, सविता पवार, सोनाली उफाडे, कावेरी कदम यांसह आशा-गटप्रवर्तक उपस्थित होत्या. यासंदर्भात निफाड पंचायत समिती कार्यालयात झालेल्या सभेत आशा कर्मचाऱ्यांच्या सन्मानाचा प्रश्न आता जनआंदोलनाचा विषय होईल, असा निर्धार व्यक्त केला.

संघटनेच्या मागण्या

संशयितावर कलम ३५४, ५०९ आणि पॉश कायद्यानुसार गुन्हा नोंदवावा. पीडितेला शासनाकडून संरक्षण, वैद्यकीय मदत, समुपदेशन आणि आर्थिक भरपाई द्यावी, महिला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, जीपीएस व्यवस्था आणि महिला साथीदारासह प्रवासाची अनिवार्यता लागू करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT