वणी : वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारे टिटवे परिसरातील अवैध मद्य विक्रेत्यांनी उच्छाद मांडल्याने कुटुंब उद्धवस्त होण्याची वेळ आली. त्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांंकडे वेळोवेळी तक्रारी करुनही अवैद्य मद्यविक्री बंद होत नसल्याने अखेर वारे व वाजुंळपाडा येथील संतप्त महिलांनी अवैध मद्य विक्रीचा अड्डा उद्धवस्त करीत दारुबंदीसाठी एल्गार पुकारला आहे. महिलांचे संतप्त रुप बघून पोलिसांनी अखेर अवैद्य मद्य विक्रेत्यांवर कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे.
वारे शिवारातील लखमापूर - भनवड रस्त्यालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये हॉटेलच्या नावाखाली गेल्या आठ नऊ महिन्यांपासून खुलेआम अवैधरीत्या मद्य विक्री होत होती. तसेच गावात इतरही दोन- तीन ठिकाणी काही दिवसांपासून अवैधपणे मद्याची सर्रास विक्री केली जात असल्याचा प्रकार घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. गावातील अनेक युवक मद्याच्या आहरी जात असल्याने व्यसनाधिनता वाढली आहे. त्यामध्ये काहींचा व्यसनामुळे अपघाती मृत्यूही झाला असल्याचे दुर्देवी घटना घडल्या आहेत.
व्यसनामुळे मद्यपी स्वत:च्या घरी गेल्यानंतर कुटुंबीयांना मारहाण, शिविगाळ असे प्रकारासह गावातील शातंतेला बाधा पोहचत आहे. याबाबत टिटवे - वांजुळे येथील महिलांनी भनवड रस्त्यालगत लोखंंडी पत्र्याच्या शेडच्या हॉटेलमध्ये अवैध देशी-विदेशी मद्याची विक्री होत असल्याबाबत कळाल्याने ग्रुप ग्रामपंचायत टिटवे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ज्योती वाटणे, शीतल शेवरे, सुनीता वाटणे, कौशलाबाई घुले, सर्व बचत गट महिला टिटवे वांजुळे महिलांसह ग्रामस्थांनी एकत्र येत अवैध विक्री बंद करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत, संंतप्त महिलांनी अवैध मद्य विक्रीच्या ठिकाणी माेर्चा नेत हॉटेल मधील मद्याच्या बाटल्या फोडल्या.
तत्पूर्वीच याबाबतचा सुगावा लागल्याने मद्यविक्रेत्याने व तेथील कामगाराने मद्याच्या बाटल्या लंपास करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त महिलांनी शेड मधील रिकाम्या मद्याच्या व पाण्याच्या बाटल्या तसेच खुर्च्या, टेबल बाहेर काढून फेकत संतप्त भावनांना मोकळी वाट करुन दिली. घटनेची माहिती मिळताच वणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस सुनिल पाटील, पोलिस उपनिरीक्षक गणेश उदे, महिला पोलिस, पोलिस हे घटनास्थळी आल्यानंतर संतप्त महिलांनी पाोलिसांनाही धारेवर धरले. दरम्यान पोलिसांनी अवैध धंदेचालकावर गुन्हे दाखल करुन कायमस्वरुपी अवैध धंदे बंद करण्याबाबात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान पोलिसांनी सुमित गांगुर्डे नामक व्यक्तीवर कारवाई करीत २ हजार २४० रुपयांचे देशी दारुच्या बाटल्या जप्त करीत गुन्हा दाखल केला आहे.