Nashik News
राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सातपूर नाशिक  pudhari photo
नाशिक

Nashik News | बोट तुटलेला दोन वर्षाच्या चिमुकलीवर तब्बल १२ तासानंतर उपचार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी सातपूर औद्योगिक वसाहतीतील राज्य कामगार विमा योजना अर्थात इएसआय रुग्णालय सोयींपेक्षा गैरसोयींमुळेच अधिक चर्चेत असते. याचा प्रत्यय दर्शविणारी आणखी एक घटना बुधवारी (दि.१७) समोर आली. अवघ्या दोन वर्षाच्या चिमुकलीला अन् तिच्या कुटुंबियांना रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे मोठा त्रास सोसावा लागला. बुधवारी (दि.१७) रात्री ९ वाजेच्या सुमारास हाताचे बोट तुटलेल्या चिमुकलीला तिच्या वडीलांनी ईएसआय रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयाने उपचार करण्यास असमर्थता दर्शवित टायअप रुग्णालयाचा पत्ता दिला. तर टायअप रुग्णालयाने इएसआयसीकडून पैसेच मिळत नसल्याचा कांगावा करीत उपचार करण्यास स्पष्ट नकार दिला. तब्बल बारा तास हा खेळ सुरू असल्याने, चिमुकलीला असह्य वेदनांचा त्रास सहन करावा लागला.

कामगारांच्या पैशातून चालणारे हे रुग्णालय कामगारांसाठीच जीवघेणे ठरत आहे. या रुग्णालयाला कामगारांकडून महिन्याकठी १३ तर वर्षाला १५६ कोटी रुपये दिले जातात. मात्र, अशातही कामगारांना या ठिकाणी परवडच सहन करावी लागते. रुग्णालय प्रशासनाचा गलथान कारभार यास कारणीभूत असून, त्याचा वेळोवेळी कामगार व त्यांच्या कुटुंबियांना फटकाच बसला आहे. आता दोन वर्षाच्या चिमुकलीला हा त्रास सोसावा लागला. सातपूर औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या योगेश देसले या कामगाराच्या दोन वर्षाच्या चिमुकलीचे रात्री ९ वाजेच्या सुमारास घरात खेळत असताना दरवाजाता बोट चिमटले. त्यामुळे तिला तातडीने ईएसआय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, प्लास्टिक सर्जरीची व्यवस्था नसल्याने, रुग्णालयाच्या संबंधित डॉक्टर्सनी टायअप रुग्णालयांचे पत्ते देसले यांना दिले. त्यानुसार गंंजामाळ येथील शहा हॉस्पिटल येथे चिमुकलीला आणले गेले. तेथील डॉक्टर्सनी तिच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करायची असून, त्याकरिता वीस हजारांची तिच्या वडिलांकडे मागणी केली. तसेच जोपर्यंंत पैसे भरले जात नाही, तोपर्यंत उपचार केले जाणार नसल्याचेही सांगितले. त्यानंतर देसले यांनी, इएसआय रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश दांडगे यांच्याशी संपर्क साधला व दुसऱ्या दिवशी त्या चिमुकलीवर उपचार केले गेले.

दरम्यान, देसले यांनी राज्य कर्मचारी विमा महामंडळाचे जिल्हा समिती सदस्य कैलास मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वैद्यकीय अक्षीक्षक सरोज जवादे यांना याबाबत जाब विचारला. यावेळी जवादे यांनी देसले यांच्याकडून शहा हॉस्पिटलविरोधात लेेखी तक्रार लिहून घेतली.

इएसआय रुग्णालयाला टायअप असलेल्या रुग्णालयांनी अशाप्रकारे पैशांची मागणी करणे चुकीचे आहे. शहा हॉस्पिटलविरोधात लेखी तक्रार घेतली असून, वरिष्ठांकडे तक्रार पाठविली जाईल. तसेच योग्य ती कार्यवाही केली जाईल.
- सरोज जवादे, वैद्यकीय अधीक्षक, इएसआय रुग्णालय.
कामगारांना सेवा देणाऱ्या इएसआय रुग्णालयाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. वारंवार तक्रारी करून संबंधितांवर काहीच कारवाई केली जात नसल्याने, आता रुग्णालय प्रशासनाविरोधात स्वाक्षरी मोहिम राबवून जन आंदोलन छेडणार आहे.
- कैलास मोरे, जिल्हा समिती सदस्य, राज्य कर्मचारी विमा महामंडळ .
योगेश देसले यांनी पूर्ण कागदपत्रांची पूर्तता न करताही हॉस्पिटलच्या संबंधित डॉक्टर्सनी त्यांच्या मुलीच्या बोटावर शस्त्रक्रिया केली आहे. पैसे मागितल्याचा त्यांचा आरोप पूर्णत: निराधार आहे.
- डॉ. पुनीत शहा, शहा हॉस्पिटल
SCROLL FOR NEXT