आजच्या 'एआय' युगातही बालनाट्य चळवळीतून सुसंस्काराची शिदोरी मिळत आहे. Pudhari News Network
नाशिक

Nashik News | बालनाट्य चळवळीला नवचैतन्य

दृष्टे नियोजन : आधुिनक युगातही नाट्यशिबिरे, कलाकार अन् प्रयोगात वाढ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : निल कुलकर्णी

लहान होत जाणारी कुटुंबे. नोकरीनिमित्त पालकांची वाढलेली व्यग्रता, व्यवधाने आणि माेबाइलच्या जमान्यात अभासी जगालाच वास्तव मानत आत्ममग्न, स्वकेंद्रित होत जाणारी मुले यांना संस्कारक्षम, सुजाण करण्यासाठी आजच्या 'एआय' युगातही बालनाट्य चळवळीतून सुसंस्काराची शिदोरी मिळत आहे. बालनाट्य शिबिरे, स्पर्धा, बालकलाकार आणि बालरसिकांची वाढलेली संख्या याचा वाढता आलेख पाहता बालनाट्य चळवळीला नवचैतन्य लाभत असल्याचे आश्वासक चित्र आहे.

  • कोविडनंतर मुले गॅझेटमध्ये अडकल्याने बालरंगभूमी स्थिती ढासळली

  • बालप्रेक्षकांना नाट्यगृहाकडे वळवण्याचे मोठे आवाहन

  • नीलम शिर्के यांनी पदभार स्वीकारातच घेतले मोठे निर्णय

  • नाशिकमध्ये बालरंगभूमीसाठी काम करणाऱ्या संस्था- २८

  • प्रतिवर्षी बालनाट्य शिबिरे घेणाऱ्या संस्था- १५ ते २०

  • वर्षभरात होणारी व्यावसायिक बालनाट्ये -३०पेक्षा अधिक

बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचा पदभार नीलम शिर्के यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये स्वीकारताच नियोजनबद्ध आराखडा आखला. परिषदेच्या विविध शाखांना भेटी देत तिथल्या अडचणी, समस्यांचा अभ्यास करून कार्यक्रम आखले. त्यामुळे दूर गेलेले बालरसिक पुन्हा थिएटर्सकडे वळत असून, बालरंगभूमीला नवचैतन्य मिळत आहे.

जानेवारीत नाशिकमध्ये बालनाट्य स्पर्धा, सावाना बालभवन आयोजित बालनाट्य स्पर्धा पार पडल्या. दोन्ही स्पर्धेत गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी सहभागी झालेल्या संघांची संख्याही वाढलेली दिसून आली. राज्य नाट्य स्पर्धेत विभागीय स्तरावर यंदा विक्रमी म्हणजे २७ संघ सहभागी झाले होते, तर सावाना बालभवन स्पर्धेतही गतवर्षीपेक्षा यंदा संघाची संख्या वाढलेली दिसली. प्रतिवर्षी उन्हाळी सुट्यांत होणाऱ्या बालनाट्य शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांची संख्या गेल्या तीन वर्षांत तिपटीने वाढल्याचे आकडेवारीहून समोर आले आहे.

संस्कारक्षम शिदोरीचे वाहक बालनाट्य बालनाट्य नव्या पिढ्यांना जोडणारा दुवा ठरत आहे. गॅझेटस‌्, इंटरनेटच्या या युगात नवी पिढी आत्ममग्न व सत्याभासी होताना दिसते. पालक कर्ममग्न झाल्याने आई-बाबांच्या जगात 'कमी' स्थान मिळणाऱ्या नव्या पिढीला आजी-आजोबांच्या संस्कारांची शिदोरी बालनाट्यामधूनच प्रभावी व उत्तमपणे पोहोचवण्याचे कार्य होत आहे.
जयदीप पवार, उपाध्यक्ष, बालरंगभूमी, नाशिक
बालरंगभूमी म्हणजे नाट्यशिबिरे, नाटुकली ही व्याख्याच बदलली. मुलांसाठी गायन, वादन, नर्तन, लाेककला. दृश्यकलांचर अंतर्भाव केला. लोककला प्रशिक्षण आणि महोत्सव राज्यभर घेतले. त्याला उदंड प्रतिसाद लाभला. रंगभूमीपासून दूर गेलेला बालरसिक पुन्हा मिळवला. दिव्यांग आणि विशेष मुलांसाठी लोककला महोत्सव घेतला त्यालाही उदंड प्रतिसाद लाभला.
नीलम शिर्के, अध्यक्ष, बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती शाखा
बालनाट्य चळवळ सशक्त होत आहे. सेलिब्रेटींची कलाकारांचा सहभाग असलेली कॉर्पोरेट बालनाट्याला उदंड प्रतिसाद लाभत आहे. दरवर्षी मे महिन्यात बालनाटकांचा 'सिझन' असतो. 'श्यामची आई' संस्कारक्षम बालनाट्य असल्याने पालकच मुलांना अशा नाटकांना घेऊन येतात. येथे आल्यानंतर मुलं यातून संस्कार अन‌् मूल्यांची शिदोरी नक्कीच घेऊन जातात.
आनंद जाधव, प्रमुख कार्यवाह, बालरंगभूमी परिषद, नाशिक

बालनाट्य शिबिरार्थींची संख्या :

  • २०२१- १५ ते २०

  • २०२२-२५ ते३०

  • २०२३- ३० ते ४०

  • २०२४- ५० ते ६०

बालनाट्य स्पर्धेतील सं‌घाची संख्या दरवर्षी वाढत आहे. पण जि. प. आणि महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग स्पर्धेत नगण्य असतो. तो वाढण्यासह राज्य नाट्यस्पर्धेतील अहिल्यानगर नाशिक केंद्रापासून वेगळे करावे, अशी मागणी संघाकडून वारंवार होत आहे.
राजेश जाधव, समन्वयक, राज्य नाट्य स्पर्धा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT