नाशिक : नाशिकच्या औद्योगिक विश्वात क्रांती घडविणाऱ्या निमा इंडेक्स-२०२४ मध्ये पाचशेपेक्षा अधिक उद्योजकांचा सहभाग असणार आहे. त्र्यंबक रोडवरील ठक्कर मैदान येथे ६ ते ९ डिसेंबरदरम्यान होत असलेल्या या प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून, देशभरातील उद्योजकांसाठी हे प्रदर्शन पर्वणी ठरणार असल्याची माहिती निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली.
तब्बल सहा वर्षाच्या खंडानंतर होत असलेल्या या प्रदर्शनाला स्टॉलधारक उद्योजकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला असून, पाचशेपेक्षा अधिक उद्योजकांचे स्टॉल्स प्रदर्शनात असणार आहेत. रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स, थ्रीडी प्रिंटिंग अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण स्टॉल्स येथे असतील. उद्योगांसाठी नेक्स्ट डेस्टीनेशन्स म्हणून नाशिककडे बघितले जात असून, देश-विदेशातील उद्योजक नाशिकमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे देशभरातील दोनशेपेक्षा अधिक खरीददार आणि ९५ पब्लिक सेक्टर युनिटला प्रदर्शनात आमंत्रित करण्यात आले आहे.
राज्यात नव्याने होणाऱ्या मोठ्या प्रकल्पांसाठी उद्योजकांची व्हेंडर नोंदणी याठिकाणी होणार आहे. प्रदर्शनातील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, आयटीएस, ऑफिस ऑटोमेशन, अपारंपरिक उर्जा, बँकिंग, विमा, वित्त, शिक्षण, पर्यटन तसेच खास आकर्षण म्हणजे ईव्ही व एआयची विविध उत्पादने प्रदर्शनाचे आकर्षण आहे.
कर्ज प्रकरणांसह विविध सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याने उद्योजकांसाठी प्रदर्शन पर्वणीच ठरणार असल्याचेही बेळे यांनी स्पष्ट केले. प्रदर्शन यशस्वीतेसाठी निमा सचिव निखिल पांचाळ, उपाध्यक्ष आशिष नहार, राजेंद्र वडनेरे, मनीष रावल, कैलास पाटील, नितीन आव्हाड, दिलीप वाघ, हेमंत खोंड, सतीश कोठारी, ललित सुराणा, नरेंद्र शालिग्राम, किरण वाजे, सुधीर बडगुजर, हर्षद बेळे आदी प्रयत्नशील आहेत.