नाशिक : महापालिकेच्या उद्यान विभागाच्या पोर्टलला प्रतिसाद मिळत असून गेल्या तीन महिन्यात या पोर्टलवर वृक्षछाटणीसाठी ४५६ तर वृक्षतोडीसाठी २१९ अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, उद्यान विभागाने या अर्जांची ऑनलाईन छाननी केल्यानंतर यातील ५० टक्के अर्ज त्रुटींमुळे अपात्र ठरले आहेत. संबधितांना आवश्यक कागदपत्रांसह नव्याने अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती उद्यान अधिक्षक विवेक भदाणे यांनी दिली आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी पदभार घेतल्यानंतर नागरिकांच्या सर्वाधिक तक्रारी असलेल्या वैद्यकीय विभाग आणि उद्यान विभागाचे कामकाज ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला होता. उद्यान अधीक्षक भदाणे यांनी माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने ऑनलाईन पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलच्या तांत्रिक चाचण्या घेतल्यानंतर जूनपासून सदरचे पोर्टल नागरिकांसाठी कार्यान्वित करण्यात आले. त्यानुसार गेल्या तीन महिन्यात नागरिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन महिन्यात उद्यान विभागाच्या पोर्टलवर वृक्षछाटणीसाठी ४५६ तर वृक्षतोडीसाठी २१९ अर्ज नागरिकांनी केले आहेत. उद्यान विभागाकडून वृक्षतोड,छाटणीसाठी नागरिकांची होणारी पिळवणूक उद्यान विभागाच्या स्वतंत्र पोर्टलमुळे थांबली आहे.
उद्यान विभागामार्फत तयार केलेल्या या पोर्टल मध्ये वृक्षतोड करण्यासह वृक्षाची छाटणीचा अर्ज ऑनलाईन करता येतो. अर्ज करतांना संबधिकांकडून अर्जात अनेक त्रुटी ठेवण्यात आल्या आहेत. काहींनी केवळ अर्ज केले आहेत, तर फोटो सोबत जोडलेले नाहीत. काहींनी अर्जासोबत शुल्क भरलेले नाही. जवळपास ५० टक्के अर्जात त्रुटी असल्याने ते अपात्र ठरले आहेत.
उद्यान विभागाच्या पोर्टलवर अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु, अनेक अर्जांमध्ये त्रुटी असल्याने त्यांना फेर अर्ज दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत. नियमानुसार अर्जांना परवानगी दिली जात आहे.विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, महापालिका.