नाशिक : विकास गामणे
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात शेतात काम करत असताना ओढावलेल्या विविध आपत्तीमुळे अपघात होऊन 369 शेतकऱ्यांना प्राण गमवावा लागला आहे, तर सहा जणांना दिव्यांगत्व प्राप्त आले आहे. शासनाकडून या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात योजनेतून 7.38 कोटींचा सानुग्रह लाभ देण्यात आला आहे. या शिवाय दिव्यांगत्व आलेल्या 26 शेतकऱ्यांना सहा लाखांचा लाभ मिळाला आहे. कृषी विभागाने केलेल्या जनजागृतीमुळे शेतकरी कुटुंबीयांना ही मदत होत आहे.
स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजना राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून राबविण्यात येते. यातून विविध प्रकारच्या अपघाती मृत्यूनंतर कुटुंबातील एका व्यक्तीच्या मृत्यूनंतरही सानुग्रह मदत देण्यात येते. या योजनेंतर्गत शेतकऱ्याचा अपघातात मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची मदत मिळते तसेच अवयव निकामी झाल्यास १ ते २ लाख रुपयांची मदत दिली जाते.
शेतीव्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, रेल्वे अपघात,पाण्यात बुडून मृत्यू, विषबाधा, वीज पडणे, नक्षलवादी हल्ला, उंचावरून पडणे, जनावरांच्या चावण्याने, जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. अन्यथा काही शेतकऱ्यांना यात अपंगत्वदेखील येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास/त्यांचे कटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता कोणतीही स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने राज्यात शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना सन 2005-06 पासून सुरू केली आहे. सदर योजनेचे 2023-24 पासून या योजनेचे नामकरण गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, असे करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत शासनामार्फत सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता रक्कम भरून विमा उतरविण्यात येतो.
अर्जासोबत सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, वारस असल्याचा पुरावा, वयाचा पुरावा, प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आदी आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. अपघाती मृत्यू आल्यास अथवा अपंगत्व आल्यास शेतकरी कुटुंबीयांनी अथवा जखमी शेतकऱ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर करावेत.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत मृत्यू झालेल्या 369 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 7.38 कोटींचे अनदान वितरित झाले आहे. तर, दिव्यांगत्व आलेल्या सहा शेतकऱ्यांना 26 लाखांचे अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग झाले आहे. शासनाकडून दोन टप्प्यांत हे अनुदान प्राप्त झाले. त्यानुसार कृषी विभागाने वर्ग केले आहेत.
प्राप्त प्रस्ताव : 481
मंजूर प्रस्ताव : 375
नामंजूर प्रस्ताव : 41
कागदपत्राअभावी प्रलंबित प्रस्ताव : 63
समितीने मंजुरीस न ठेवलेले प्रस्ताव : 2
मृत्यू झालेले शेतकरी : 369
दिव्यांगत्व आलेले शेतकरी : 6
शेतात काम करताना ओढविलेल्या मृत्यूने शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अनुदान दिले जाते. या योजनेची जिल्ह्यात कृषी विभागाकडून जनजागृती झाल्याने मृत्यूनंतर प्रस्ताव विभागाकडे प्राप्त होतात. आतापर्यंत 375 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 7.64 कोटींचे अनुदान वितरित झाले आहे.महेश विठेकर, प्रभारी, जिल्हा कृषी उपसंचालक, नाशिक