साडी file photo
नाशिक

Nashik News | जिल्ह्यात ३५ हजार लाभार्थी साडीपासून वंचित

Ration Dukan: पुरवठ्याचा सर्व्हर डाऊन : रेशन दुकानांत महिलांचे हेलपाटे

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय रेशनकार्डधारकांना राज्य शासनाकडून साडी वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ८० टक्के लाभार्थी महिलांना साडीचे वाटप पूर्ण झाले आहे. मात्र, पंधरवड्यापासून पुरवठा विभागाचा सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने ३३ हजार ८८० लाभार्थी महिलांना लाभापासून वंचित राहावे लागले आहे. (Nashik Supply Department server down)

रेशन दुकानावर अन्नधान्याबरोबरच आता साडीही मिळणार आहे. राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने या संदर्भातील निर्णय घेतला आहे. राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असून, प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत मिळणार आहे. विशेष म्हणजे, शासनाने निश्चित केलेल्या सणादिवशी या साडीचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये चैत्र पाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळी सणानिमित्त स्वस्त धान्य अर्थात् रेशन दुकानातून 'आनंदाचा शिधा' देणाऱ्या राज्य सरकारने आता राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला.

चालू वर्षाच्या प्रारंभी राज्यातील अंत्योदय रेशनकार्डधारक कुटूंबातील महिलेला दरवर्षी एक मोफत साडी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. रेशन दुकानांमधून हे साडी वाटप केले जाते. जिल्ह्यातील १५ तालुक्यातील एक लाख ७६ हजार ५५२ कार्डधारकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. पण चालूवर्षीच्या प्रारंभी सुरू झालेल्या योजनेत अनेक अडथळे येत आहे. एप्रिल-मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा, त्यानंतर नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे चार महिने अगोदरच साडी वाटप रखडले होते. त्यात १५ दिवसांपासून पुरवठ्याच्या सर्व्हरला अडथळे येत असल्याने साडी वाटप रखडले आहे.

जिल्ह्याला एक लाख ७६ हजार ५५२ साड्या राज्याच्या पुरवठा विभागाकडून प्राप्त झाल्यात. दोन हजार ६०९ दुकानांमधून एक लाख ४२ हजार ६७२ लाभार्थी कुटूंबांना साड्यांचे वाटप पूर्ण झाले. अद्याप ही ३३ हजार ८८० लाभार्थींना सर्व्हरअभावी साड्या वितरण ठप्प आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांवर दुकानांचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यातील एक लाख ४२ हजार ६७२ पात्र लाभार्थींना साड्यांचे वितरण पूर्ण झाले आहे. साधारणत: ८० टक्के काम पूर्णत्वास आले आहे. तर ३३ हजार ८८० पात्र लाभार्थींना साडी वाटप करणे बाकी आहे.
कैलास पवार, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी, नाशिक.

शिल्लक साडी वाटप

  • बागलाण : ३२६७

  • चांदवड : ६८२

  • देवळा : ७४७

  • दिंडोरी : २३८२

  • मालेगाव धाविअ : ३१३८

  • नाशिक धाविअ : २३६५

  • इगतपुरी : २२२५

  • कळवण : १९३८

  • मालेगाव : १६६३

  • नांदगाव : २११९

  • नाशिक : १३१७

  • निफाड : १५६१

  • पेठ : ११९५

  • सिन्नर : १०२१

  • सुरगाणा : ५८१५

  • त्र्यंबकेश्वर : १६५६

  • येवला : ७८९

  • एकुण : ३३,८८०.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT