नाशिक : येथील प्रादेशिक परिवहन विभागात २०१५ साली राज्यातील पहिले स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र कार्यान्वित करण्यात आले. येथे गेल्या 10 वर्षांत एकूण २ लाख ५६ हजार २४१ व्यावसायिक वाहनांची फिटनेस तपासणी करण्यात आली. तपासणीअंती ७७ हजार ४०९ वाहने 'अनफिट' आढळली. मात्र, आवश्यक दुरुस्त्या व सुधारणांनंतर बहुतांश वाहने पुन्हा तपासणीला पात्र ठरली आणि रस्त्यावर धावू लागली. दुसरीकडे, १ लाख ७८ हजार ८३२ वाहने पहिल्याच प्रयत्नात फिटनेस टेस्ट उत्तीर्ण झाली, अशी नोंद आहे.
नाशिक प्रादेशिक परिवहन विभागात ऑक्टोबर २०१५ मध्ये स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. या प्रणालीमुळे वाहन तपासणीत सुसूत्रता येऊन, मानवी हस्तक्षेप टाळण्यास मदत झाली आहे. नाशिकमधील केंद्राच्या यशस्वी अहवालानंतर, राज्यभर अशी २३ स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या केंद्रांमध्ये रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, बेस्ट बस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने आणि इतर व्यावसायिक वाहनांची तंदुरुस्ती (फिटनेस) तपासणी केली जाते. या तपासणी प्रक्रियेत वाहनांचे ब्रेक, प्रदूषण पातळी, सस्पेन्शन, चाके, वेग, हेडलाइट आणि टेललाइट आदी घटकांचा समावेश असतो. संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित असल्याने अधिक अचूक व पारदर्शक तपासणी शक्य होते.
हेडलाइट अलायनर, स्पीडोमीटर टेस्ट, रोलर ब्रेक टेस्ट, कारसाठी सस्पेन्शन टेस्टर, स्टेरिंग प्ले, गिअर, स्पीड गव्हर्नर, प्रवासी वाहनांचे व्हीएलटीडी अशा विविध प्रकारच्या चाचण्या यात हाेत असतात. स्वयंचलित यंत्रांद्वारे या सर्व तपासण्या ५ ते ८ मिनिटांत पूर्ण होतात. शहरातील या केंद्रात दररोज सरासरी १८० ते २०० व्यावसायिक वाहनांची तपासणी होत असते. नवीन वाहने असल्यास पहिल्या आठ वर्षांत दर दोन वर्षांनी, तर आठ वर्षांनंतर दरवर्षी व्यावसायिक वाहनांची तपासणी करणे बंधनकारक असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देशमुख यांनी दिली.