नाशिक

Nashik News : 20 हजार दुबार नावे वगळली, २२ तारखेला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्हा निवडणूक शाखेकडून 15 विधानसभा मतदारसंघांतील साधारणत: दुबार मतदारांची २० हजार नावे यादीमधून वगळण्यात आली. सोमवारी (दि. २२) अंतिम मतदारयादी प्रसिद्धी केली जाणार आहे.

फेब्रुवारी अखेरच्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विशेष मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये नवमतदार नोंदणीसोबतच मतदारांच्या नाव व पत्त्यात दुरुस्ती केली जात आहे. याशिवाय मतदार यादीतून दुबार तसेच दिवंगत व्यक्तींची नावे वगळण्याची प्रक्रिया राबविली जात आहे.

निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संभाव्य दुबार नावे शोधण्यात येत आहेत. त्यासाठी दोन टप्प्यांत तपासणी केली जाते. प्रथमत: कुटुंबातील सदस्य व पत्त्याचा तपशील तसेच समान छायाचित्रे व नावे असलेल्या नोंदींचा यात समावेश आहे. सॉफ्टवेअरद्वारे अशी संदिग्धता असलेली ५४ हजार नावांची पडताळणी केली गेली. त्यामध्ये जिल्ह्यातील १५ मतदारसंघात आतापर्यंत २० हजारांच्या आसपास दुबारे नावे सापडली. प्रशासनाकडून ही सर्व नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.

२२ ला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध

दरम्यान, आयोगाच्या मागदर्शनानुसार 5 जानेवारीला अंतिम याद्यांची प्रसिद्धी केली जाणार होती. पण आयोगाकडून यादी प्रसिद्धीच्या कार्यक्रमाला मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार आता २२ तारखेला मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी केली जाणार आहे. तरी मतदार यादीत नावनोंदणीची प्रक्रिया सुरू असून, नागरिकांनी यादीत नाव समाविष्ट करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT