दारणा धरण नाशिक,www.pudhari.news Pudhari News network
नाशिक

Nashik News | सिंहस्थात पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी 1,250 कोटी

दारणा धरण थेट पाइपलाइन योजनेचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आसिफ सय्यद

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी प्रशासकीय पातळीवर जोरदार सुरू करण्यात आली आहे. सिंहस्थ काळात येणाऱ्या लाखो साधू- महंत व कोट्यवधी भाविकांची पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी तब्बल १ हजार २५० कोटींचा आराखडा महापालिकेने तयार केला आहे.

नाशिक महानगरपालिका पाणीपुरवठा पाइनलाइन योजना आराखडा मध्ये दारणा धरण थेट पाइपलाइन योजना, गंगापूर धरणावर नवीन जॅकवेल व पंंपिंग स्टेशनच्या उभारणीसह साधुग्राममध्ये १८ किलोमीटर लांबीच्या मुख्य व शाखा वितरण वाहिन्या तसेच ३६ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या, जलकुंभ, विल्होळी येथे १३७ दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र, विल्होळी ते साधुग्रामपर्यंत २५ किलोमीटर लांबींची थेट जलवाहिनी, मुकणे धरण येथे वाढीव क्षमतेची पंपिंग मशीनरी बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

येत्या २०२७- २८ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या साधू-महंत व भाविकांना विविध प्रकारच्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी महापालिकेने सुमारे सात हजार कोटींचा आराखडा तयार केला आहे. सिंहस्थ काळात शुद्ध व मुबलक प्रमाणात पाणीपुरवठ्याचे आव्हान असणार आहे. ही बाब लक्षात घेऊन पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी १ हजार २५० कोटींची तरतूद सिंहस्थ आराखड्यात केली आहे. केवळ सिंहस्थ काळापुरतीच नव्हे, तर नाशिकच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता भविष्यकालीन पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन पाणीपुरवठा यंत्रणेवरील खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.

नाशिक रोडचा पाणीप्रश्नही सुटणार

वालदेवी नदीतील प्रदूषित पाणी दारणा नदीपात्रात मिसळत असल्यामुळे चेहेडी बंधाऱ्यातील पाण्याला उग्र दर्प येतो, त्यामुळे या बंधाऱ्यांतून नाशिक रोड परिसरात केला जाणारा पाणीपुरवठा सध्या बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक रोड भागात पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. दारणा धरण थेट पाइपलाइन योजनेची अंमलबजावणी झाल्यास सिंहस्थ कुंभमेळ्यातील पाणीनियोजनाबरोबरच नाशिक रोडचा पाणीप्रश्नही कायमचा निकाली निघणार आहे. दारणातील पाणी आरक्षण वापरणे महापालिकेला शक्य होणार आहे.

साधुग्रामचा खर्च २०.६७ कोटींवरून २६५ कोटींवर

२०१५-१६ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात साधुग्राममधील जलवाहिन्यांसाठी २०.६७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. यात एमडीपीई पाइप वापरण्यात आले होते. परंतु सिंहस्थाचा कालावधी संपल्यानंतर या पाइपचा पुनर्वापर करणे शक्य होणार नसल्यामुळे आगामी सिंहस्थासाठी साधुग्राममध्ये डीआय पाइपचा वापर केला जाणार आहे. साधुग्राम क्षेत्रात झालेली वाढ, साहित्याच्या दरात झालेली वाढ, पाइपलाइनच्या साहित्यातील बदलाचा विचार करता, साधुग्राममधील जलवाहिन्यांसाठी २४० व २५ कोटी अशा प्रकारे २६५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

गंगापूर धरणासाठी नवीन जॅकवेल

नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणावर नवीन जॅकवेलची उभारणी सिंहस्थ आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली आहे. गंगापूर धरणातील अस्तित्वातील जॅकवेलची उभारणी १९९९-२००० मध्ये करण्यात आली होती. जॅकवेल २५ वर्षे जुने झाल्याने नव्याने जॅकवेल उभारणीसाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथे वाढीव क्षमतेच्या पंपिंग मशीनरीसाठी २० कोटींची तरतूद आहे. त्याचप्रमाणे विद्युतविषयक व इतर कामांसाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

धरणातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती

  • पंपिंग स्टेशन्सची संख्या : गंगापूर धरण, चेहेडी (दारणा नदी) व मुकणे धरण

  • दैनंदिन होणारा पाणीपुरवठा : ५५५ दशलक्ष लिटर्स

  • जलशुद्धीकरण केंद्रांची संख्या : ७; एकूण क्षमता ६०९ दशलक्ष लिटर प्रतिदिन

  • नव्याने बांधण्यात येत असलेले जलशुद्धीकरण केंद्र : बारा बंगला व पंचवटी (क्षमता १०६ दशलक्ष लिटर प्रतिदिन)

  • शुद्ध पाण्याचे बूस्टर पंपिंग स्टेशन : ७

  • कार्यरत जलकुंभ : ११९

  • बांधकाम सुरू असलेले जलकुंभ : ३०

  • अशुद्ध पाण्याच्या पाइपलाइन : ८३ कि.मी.

  • वितरण पाइपलाइन : २,५०२

सिंहस्थासाठी प्रस्तावित पाणीपुरवठा व्यवस्था

  • दारणा धरण थेट जलवाहिनी अंतर्गत विल्होळी येथे १३७ दललि क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र : ४५० कोटी

  • दारणा धरण पंपिंग स्टेशन हेडवर्क व मुख्य उर्ध्ववाहिनी : २३० कोटी

  • साधुग्राम येथे भाविकांसाठी २ जलकुंभ : ५ कोटी

  • साधुग्राम व भाविक मार्गावर जलवाहिन्या : २४० कोटी + २५ कोटी

  • गंगापूर धरण येथे जॅकवेल बांधणी : २०० कोटी

  • गंगापूर धरण येथे वाढीव क्षमतेची पंपिंग मशीनरी : २० कोटी

  • मुकणे धरण येथे वाढीव क्षमतेची पंपिंग मशीनरी : २० कोटी

  • पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र येथे पंपिंग मशीनरी : ३ कोटी

  • बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र येथे पंपिंग मशीनरी : ३ कोटी

  • शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथे पंपिंग मशीनरी : २.५ कोटी

  • जलशुद्धीकरण केंद्रात आवश्यक केमिकल्स व इतर साहित्यपुरवठा : १.५० कोटी

  • गंगापूर धरण येथे जॅकवेलसाठी पंपिंग मशीनरी ५० कोटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT