नाशिक : श्री कपालेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी दिलेल्या दानाचे गेल्या काही दिवसांपासून मूल्यांकन केले जात असून, नुकतेच संस्थानला प्राप्त मौल्यवान धातूचे शासकीय मान्यताप्राप्त मूल्यांकनकर्त्यांच्या माध्यमातून मूल्यांकन करण्यात आले. त्यात तब्बल पाच लाख रुपयांचे सोने-चांदी भाविकांनी दान केल्याचे समोर आले आहे. संस्थानच्या इतिहासात प्रथमच सीसीटीव्ही कॅमेर्यात मौल्यवान वस्तूंचे मूल्यांकन करण्यात आले. (Gold & Jewelry Valuation)
मंदिर परिसरातील पाच दानपेट्यांपैकी केवळ दोनच दानपेट्यांचा हिशेब दिला जात असल्याने, भाविक देवेंद्र पाटील व राहुल बोरीचा यांनी धर्मादाय उपायुक्त कार्यालयाकडे तक्रार केली होती. दरम्यान, दानपेटीतील रकमेवरून हेमंत उर्फ पप्पू गाडे, अविनाश गाढे व इतरांमध्ये तुफान वाद झाल्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी सर्व पाच दानपेट्या सील करण्याचे आदेश दिले होते. यावेळी संस्थानचे अध्यक्ष अॅड. अक्षय कलंत्री यांनी धर्मादाय उपायुक्त कार्यालयात पाचही दानपेट्यांचे सील उघडून मोजणी करण्याची मागणी केली असता, निरीक्षक एच. के. गाडके, एस. आर. हळदे, पी. जे. अत्तरदे यांच्यामार्फत पोलिस बंदोबस्तात दान रकमेची मोजणी केली. तसेच दानपेटीचा स्वतंत्र हिशेब ठेवून संस्थानच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याचे आदेश दिले. दानपेटीत तब्बल 11 लाख 8 हजार 541 रुपये इतकी रक्कम निघाली असून, दानात प्राप्त सोने-चांदी या मौल्यवान धातूंचेही मूल्यांकन दि. 1 व 2 डिसेंबर रोजी करण्यात आले असता, 98 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या वस्तू व तीन लाख 72 हजार 215 चांदीच्या वस्तू अशा एकूण 4 लाख 71 हजार 15 रुपयांच्या सोने-चांदीच्या वस्तू निघाल्या आहेत.
संस्थानचे अधिकृत शासकीय मान्यताप्राप्त मूल्यांकनकर्ते चेतन राजापूरकर यांच्या उपस्थितीत सीसीटीव्ही कॅमेर्यात सर्व वस्तूंची मोजणी करण्यात आली. राजापूकर यांनी कपालेश्वरचरणी मानद सेवा दिली असून, मूल्यांकन करताना संस्थानचे अध्यक्ष अॅड. अक्षय कलंत्री, खजिनदार सीए श्रीकांत राठी, विश्वस्त मंडलेश्वर काळे, श्रद्धा दुसाने, रावसाहेब कोशिरे आदी उपस्थित होते. दरम्यान, संस्थानच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारचे मूल्यांकन करण्यात आले आहे.
भाविकांनी संस्थानला दान केलेल्या मौल्यवान वस्तू गुरवांच्या ताब्यात असून, त्या त्वरित संस्थानकडे जमा कराव्यात यासाठी पाच गुरवांना संस्थानच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. प्रभाकर श्रीधर गाडे, अविनाश श्रीधर गाढे, प्रसाद शरदचंद्र गाढे, हेमंत उर्फ पप्पू पद्माकर गाडे, प्रकाश उर्फ साहेबराव पद्माकर गाडे यांच्यासह 13 गुरवांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पुढील तीन दिवसांत मौल्यवान धातूंच्या वस्तू संस्थानकडे जमा कराव्यात अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नोटिसीद्वारे देण्यात आला आहे.
संस्थानतर्फे इतिहासात पहिल्यांदाच भाविकांनी दिलेल्या वस्तूंचे मूल्यांकन करण्यात आले. भाविक व संस्थानने कपालेश्वर महादेवांच्या शृंगारासाठी गुरवांकडे दिलेल्या वस्तू मूल्यांकन करणेकामी संस्थानमध्ये हजर करण्याबाबत सर्व पाच गुरव परिवारांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. परंतु अद्याप त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. या वस्तू मूल्यांकन करणेकामी हजर न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.अॅड. अक्षय कलंत्री, अध्यक्ष, श्री कपालेश्वर महादेव मंदिर संस्थान, नाशिक.
मूल्यांकन केलेल्या दागिन्यांमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण दागिने बघायला मिळाले. यात नवसपूर्तीनिमित्त दिलेले विविध सोने व चांदी वस्तू जशा घराच्या चांदीच्या प्रतिकृती, चांदीचे पाळणे तसेच बेलपान हार, बेलपान, त्रिशूळ इत्यादी दागिने मोठ्या प्रमाणात बघायला मिळाले. तसेच मंदिरातील गुरव यांच्या ताब्यातील प्राचीन दुर्मीळ देवाचे दागदागिने उपलब्ध न झाल्याने त्याचे व्हॅल्युशन करता आलेले नाही.चेतन राजापूरकर, गव्हर्नमेंट प्रूव्हड व्हॅल्युअर, नाशिक.